पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शरीर आणि त्यामधील सूक्ष्म प्राण चैतन्य यांची अष्टांगाने केलेली क्रियाशील प्रार्थना आहे. ही प्रार्थना फक्त टाळ्या वाजवून किंवा स्तोत्र म्हणून करावयाची नाही. शरीरातील पंचप्राणांचा वापर करून परमेश्वराची आरती करावयाची आहे. त्याची प्रार्थना करावयाची आहे. प्रार्थना म्हणजे आभार प्रदर्शन. जे आपल्याला प्राप्त झालेले आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी केलेली कृती. कालचा दिवस तुझ्या कृपाप्रसादाने चांगला गेला त्याबद्दल कृतज्ञता, उद्याचा दिवस तुझ्या सत्कारणी लागावा ही अपेक्षा या प्रार्थनेतून व्यक्त होते. प्रार्थना म्हणजे याचना नाही. भूतकाळात तसेच वर्तमानकाळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे प्रमाणात यश मिळणारच आहे. तो तुमचा हक्कच आहे. ते तुमचे संचित आहे. याच कारणासाठी 'सत्कर्म करण्यास सदैव तयार' हे आपले ब्रिदवाक्य असले पाहिजे. तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरूवात सूर्यनमस्काराने करा. प्रकाशकिरणांचा प्रवेश घरात होण्यापूर्वी या ज्ञानभास्कराचे स्वागत करा. 'महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे।´ याचे आभार माना. तुमच्या घरात प्रथम प्रवेश करणारा हा असामान्य अतिथी आहे. हाच एक साक्षात देव आहे ज्याला आपण प्रत्यक्ष बघू शकतो. तो आपल्या सर्व कर्मांचा साक्षिभूत परमेश्वर आहे. प्रत्यक्ष धर्मतत्त्वच त्याच्या रुपाने अवतिर्ण होते. तो आपला आदर्श आहे. त्याच्यासारखे वागणे हे आपले ध्येय आहे. सकाळी लवकर उठा, झोप झटका, आळस टाका. त्याच्या स्वागतासाठी तयार व्हा. साष्टांग नमस्कार घालून त्याचे मनोभावे स्वागत करा. आभार माना. एखादा पाहुणा घरात आल्यावर काही वेळाने त्याचे स्वागत केले तर चालेल कां ? ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। मेदवृद्धीतून मुक्ती २५