पान:मेणबत्त्या.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१


 ८ मधमाशांचे मेण― या मेणांत मिरिसीक व सेरोटीक आसिडें असतात. हे मेण, मेणबत्याच्या कामी वापरण्यापूर्वी स्वच्छ करावे लागते. निरनिराळ्या ठिकाणाहून येणारे मेण एक सारख्याच रीतीने स्वच्छ होत नाही.
 बरक्ले साहेबांच्या अनुभवावरून असे ठरले आहे की इंग्लंड, हॅमबर्ग, ओडीसा, पोर्तुगाल, मोगादोर, झांझीबार, ईस्ट व वेस्ट इन्डीज, आणि उत्तर अमेरिका या ठिकाणचे मेण लौकर स्वच्छ होते. परंतु क्युबा, डांझीग, कोनिंगबर्ग, ग्यांबीया व ग्याबून या ठिकाणचे मेण स्वच्छ करण्यास फार त्रास पडतो. फार मेहनत करूनही या मेणाचा रंग पाहिजे तितका पांढरा स्वच्छ होत नाही. मेण स्वच्छ करण्याच्या दोन रीति आहेत. एक सूर्यप्रकाशाने मेण स्वच्छ करण्याची व दुसरी रसायन रीतीनें मेण स्वच्छ करण्याची.
 १ सूर्यप्रकाशाने मेण स्वच्छ करण्याची रीत-अ. मेणाचे लहान लहान तुकडे करून एका हौदांत टाकावेत. त्या हौदांत वाफेच्या नळ्यांचे वेटोळे लागू केलेले असते. त्या वेटोळ्यांतील नळ्यांस भोकें पाडलेली असतात; व त्या भोकांतून वाफ त्या हौदांत येते. नंतर ६४ मण* कच्चे इतक्या वजनाचे मेण असेल तर सवा* शेर सलफ्युरीक आसीड, चाळीसपासून पन्नास शेर थंड गोड्या पाण्यात मिळवून तें मिश्रण त्या मेणाच्या तुकड्यांत मिळवावें. ज्या हौदांत मेणाचे तुकडे टाकावयाचे तो लोखंडी पत्र्याचा असून त्यास आंतून शिशाची कल्हई केलेली असावी. ते सर्व मिश्रण उकळी फुटेपर्यंत वाफेने उकळून चांगले ढवळावे. असे सुमारे अर्धा तास करून नंतर ते मिश्रण स्थिर ठेवावें.
____   * शेर ह्मणजे चाळीस कंपनी रुपये भार समजावा. अशा चाळीस शेरांचा एक कच्चा मण समजावा.