पान:मेणबत्त्या.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९


कपडा जरासा ओला असला तरी त्यांतून स्टिअरीन गळणार नाही. ह्मणून ते दोन्ही पदार्थ अगदी कोरडे व स्वच्छ असावेत.
 याप्रमाणे तयार केलेले स्टिअरीन शुद्ध केलेल्या चरबींत मिळवून ओतीव मेणबत्त्या करतात.
 या कृतीने स्टिअरीन तयार करतांना ओलियन ह्मणून जो पातळ पदार्थ निघतो तो खाली लिहिल्याप्रमाणे शुद्ध करावा. हा पदार्थ ओलियन असतो, ओलिईक आसीड नसते, हे पक्कें लक्षात ठेवावें.
 एका लहान तोंडाच्या व आंतून शिशाची कल्हई केलेल्या लोखंडी पात्रांत १०० शेर ओलियन टाकावे. या पात्राचा आकार ताक करण्याच्या डे-यासारखा खालून मोठा व तोंड लहान असा असावा. या ओलियन पदार्थास वाईट वास असतो. बाजारी सलफ्युरीक आसीड १-२ शेर ( त्या वाईट वासाच्या प्रमाणाने) घेऊन त्यांत सहापट थंड पाणी मिळवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्या ओलियनमध्ये मिळवून ते भांडे खूप जोराने हलवावे. ह्मणजे आंतील मिश्रण सपाव्याने ढवळले जाते. अथवा इतर यांत्रिक साधनाने ते मिश्रण खूप ढवळावे. त्या मिश्रणास पांढरवट रंग आला ह्मणजे ढवळणे बंद करावें. नंतर ते मिश्रण शिशाची कल्हई केलेल्या दुसऱ्या भांड्यांत काढून स्थिर ठेवावें. वर आलेला फेस काढून टाकावा. एक दोन दिवसांत मळ वगैरे पदार्थ तळी बसतात. नंतर वरचे निवळ तेल लोकरीच्या जाड कपड्यांतून गाळून काढावे. याचा उपयोग साबू, दिव्यांत जाळणे व कृतीचे पामिटीक आसीड करण्याकडे करावा.
 ६ ताडाचे तेल-यास शुद्ध करण्याची जरूर नसते. हे तेल व चरबी मिश्र करून त्यापासून सुटी घट्ट स्निग्ध आसिडे तयार करतात.