पान:मेणबत्त्या.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५


 २. एका लोखंडी पंचपात्रांत चरबी घालून वाफेने धुवावी, त्या पंचपात्राच्या बुडास। २।४ नळ्या लावून त्या नळ्यांतन चरबींत अर्धा तास वाफ सोडावी ह्मणजे वाफ चरबीच्या खालच्या भागांतून वर निघते. त्यायोगें चरबी पातळ होते व तिच्यातील मळ खाली जमतो. नंतर ती स्थिर ठेवावी ह्मणजे थंड होते. नंतर वरची चरबी काढून घ्यावी; हीच स्वच्छ चरबी होय.
 ३. शिशाच्या कल्हई केलेल्या कढईत १०० शेर चरबी घालून उष्णतेने पातळ करावी. नंतर एक शेर सोराखार १० शेर पाण्यांत टाकून ते मिश्रण त्या पातळ चरबीत मिळवून, सर्व मिश्रण वरचेवर ढवळीत जावें. नंतर लागलीच त्यांत अकरा शेर पाण्यांत एक शेर सलफ्युरीक आसीड या प्रमाणाचे मिश्रण १०-१५ शेर मिळवावें. सर्व एकदां जोराने ढवळून, उष्णता कमी करून स्थिर ठेवावें. ह्मणजे चरबी वर जमते व पाणी खाली रहाते. वर जमलेल्या चरबीचा गोळा काढून घेऊन ४०० शेर उकळत्या पाण्यात टाकून पहिल्या कृतीप्रमाणे धुवून काढावा.
 ४ एक भाग नाइट्रीक आसीड व नऊ भाग पाणी याप्रमाणाचें मिश्रण सुमारे १० शेर घेऊन, पातळ केलेल्या १०० शेर चरबीत मिळवून जोराने ढवळावी. नंतर स्थिर ठेवून वरची चरबी काढून घेऊन पहिल्या कृतीप्रमाणे धुवावी.
 वरील प्रत्येक कृतींत शेवटी निघालेली चरबी उकळत्या पाण्यांत अवश्य धुतली पाहिजे ह्मणजे तिच्यांतील आसिडांचा व क्षारांचा भाग खालच्या पाण्यात निघून जातो.
 याप्रमाणे स्वच्छ केलेली चरबी गरम करून पातळ करावी. नंतर सावकाश थंड होऊ द्यावी. मधून मधून तीस वरचेवर ढवळीत जावें.