पान:मेणबत्त्या.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३


झालेली चरबी वर जमते. ती काढून घेऊन बायलर साफ करावे. त्यांत ती चरबी घालून तीस ३३८° पासून ३९२° फा. अंशाची उष्णता द्यावी. ह्मणजे ती बर्फासारखी पांढरी व कठिण होते. या शेवटच्या गरम करण्याच्या कृतीत त्या चरबीस ती गरम करतांनां जर किंचित् खराब (जळका ) वास येऊ लागला, तर लागलीच उष्णता बंद करावी. वर लिहिल्यापेक्षा कमी उष्णता तीस पोचली असली, तरी पुरे होते. या वेळेस चरबी गरम करतांना तिच्यांत पाणी नसते. ह्मणून ज्यास्त ऊष्णतेने ती जळते आणि जर जळाली तर तीस वाईट ( जळका ) पास येतो, ह्मणून जरा जळका वास आला की ऊष्णता बंद करावी. नंतर ती थंड होऊ द्यावी. थंड झाल्यावर ती बर्फासारखी पांढरी व चांगला वास येणारी आणि कठीण अशी होते. तिचे गोल अथवा चौकोनी मोठ मोठे गोळे करून कोठारांत ठेवावे. हिच्यांत वाती बुचकळून मेणबत्या करतात.
 जुन्या वेळेस वर लिहिल्याप्रमाणे चरबी स्वच्छ करून तिच्या मेणबत्या करीत होते. परंतु त्या मेणबत्या स्पर्शास तेलकट व लौकर वितळणाऱ्या होत होत्या. वरच्या कृतीने चरबी जरी दिसण्यांत स्वच्छ होते, तरी तिचे पातळ होण्याचे उष्णमान वाढत नाही. ह्मणून चरबी व लार्ड या दोन पदार्थाचा त्याच स्थितीत चांगल्या मेणबत्या करण्याकडे पुढे उपयोग करीत नाहीसे झाले.
 २ लार्ड-वरच्या रीतीनेच तयार करून ठेवावे.
 ३ स्टिअरीन-या द्रव्याचे पातळ होण्याचे उष्णमान चरबी व लार्ड यांच्या पातळ होण्याच्या उष्णमानापेक्षां बरेंच अधिक आहे; व स्टिअरीन त्या दोहोंपेक्षा अधिक कठिण आणि स्पर्शास कमी तेलकट आहे, ह्मणून त्याचा उपयोग मेणबत्यांकडे करूं लागले.