पान:मेणबत्त्या.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८


आसिडें दाबाने काढता येतात. परंतु तुपांतील घट्ट आसिडांचे पातळ होण्याचे ऊष्णमान मात्र स्टिअरीनच्या पातळ होण्याच्या ऊष्णमानापेक्षा कमी आहे. तुपांतील घट्ट पदार्थाच्या मेणबत्त्या जळण्यांत चांगल्या असतात. परंतु तूप, लोणी, हे खाण्याचे पदार्थ असून फार महाग आहेत व त्यांतील घट्ट आसिडाचे पातळ होण्याचे ऊष्णमान थोडे कमी आहे, ह्मणून त्यांचा उपयोग मेणबत्त्यांकडे करीत नाहीत. बटेरिक आसिडाचे पातळ होण्याचे ऊष्णमान फारच कमी आहे. तें पाणी थिजण्यास लागणाऱ्या ऊष्णमानापेक्षा २०° सेंटीग्रेड अंश कमी असते. शुद्ध लोण्याचे पातळ होण्याचे ऊष्णमान ९५° फा. अंश आहे. तुपाचे यापेक्षा अधिक असते. तूप व लोणी यांमधून निघणाऱ्या आसिडाचे पातळ होण्याचे ऊष्णमान १०७०-११३° फा. अंश आहे.
 येथपर्यंत मूळ द्रव्यांची माहिती व उत्पत्तीविषयीं वर्णन झाले. परंतु यापेक्षाही जास्त महत्वाची व अधिक उपयोगी माहिती दिली नाही. ह्मणून ती येथे सांगतो.
 मेणबत्त्याच्या कामी अमुक द्रव्य उपयोगी पडेल, हे कशावरून ठरवावे, असा सहज प्रश्न उत्पन्न होतो. ज्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध द्रव्य अधिक असेल, तो पदार्थ त्या कामी वापरावा असें ठोकळ उत्तर आहे. परंतु कोणत्याही स्निग्ध पदार्थात घट्ट व स्निग्ध द्रव्य किती आहे, ते कसे समजावे, असा दुसरा प्रश्न सहजच उद्भवतो. कोणत्याही स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्णमान समजले, तर त्यांत घट्ट व स्निग्ध द्रव्य किती आहे, ते समजू शकते. तेव्हां स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्णमान कसे काढावे, तें प्रथम समजले पाहिजे. ती रीति प्रथम देतो.