पान:मेणबत्त्या.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२




घटक अद्याप बरोबर समजले नाहीत. तरी मुख्यत्वेकरून यांत पामिटीक आसीड बरेच असते.
 १३. जपानी मेण:-जरी या पदार्थास मेण असें नांव आहे, तरी तो चरबीच्या जातीचा पदार्थ आहे. कारण त्याचे मुख्य घटक पामिटीक आसीड व ग्लिसराईन हे पदार्थ आहेत. व्हस सकसीडेनिया व हस. व्हरनीसीफेरा नामक झाडांच्या फळांपासून हे मेण काढतात. या झाडास काकडशिंगीचे झाड हे नांव मराठी भाषेत आहे, असें डा. मंत्री यांच्या कोशावरून समजले. काकडशिंगी झाडाच्या फळांपासून हे मेण काढता येते. फळे प्रथम चांगली वाळवितात, नंतर दगडी जात्यांतून दळून किंवा लाकडी उखळांत कुटून काढतात. नंतर चाळून व पाखडून त्यांची कवचे व वरची साल काढून टाकतात. खाली राहिलेला कुटलेला भाग किंतानाच्या पिशव्यांत घालून त्या पिशव्या उकळत्या पाण्यात टाकतात. नंतर दाबून मेण काढतात. ४०० शेर बियांचे १०० शेर मेण निघते. या मेणाचा तुकडा मोडला असतां आंतील रंग पांढरा किंवा पिवळसर हिरवा असतो. यास चरबीसारखा गंध येतो; व तो वाईट प्रकारचा असतो. याचे पातळ होण्याचे ऊष्णमान १२०°-१३०° फा. अंश आहे. या मेणांत ग्लिसराईन असल्यामुळे त्याची केलेली मेणबत्ती जळतांना आक्रिओलिनचा वाईट वास येतो. हे वनस्पतिज तेल आहे, परंतु घट्ट असल्यामुळे त्यास मेण ह्मणतात.
 १४. मिरटील मेण:-हे घट्ट फिकट हिरव्या रंगाचे असते. तें मिरीकाकार्डी फोलिया व मिरिका सेरीफेरा नामक झाडांच्या फळांपासून त्या फळांची साल उकळून काढतात. पहिल्या जातीची झाडे लुईसियाना प्रांतांत व दुसऱ्या प्रकारची झाडें केप ऑफ गुड होप येथे होतात. त्यांचे