पान:मेणबत्त्या.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५


अधिक असते. मेणबत्त्या करण्यांत खुद्द चरबीचाच उपयोग करण्याच्या कामी तिच्या अंगी दोन दोष आहेत. एक तर ओलिईन नामक पातळ पदार्थ तिच्यांत असल्यामुळे, तिच्या केलेल्या मेणबत्त्यांचे वितळण्याचे उष्णमान कमी होते; व त्यामुळे त्या मेणबत्तीवर जळतांना ओघळ जातात. दुसरे तिच्यांत ग्लिसराईन असल्यामुळे त्या मेणबत्तीचा उजेड पडावा तितका स्वच्छ व पांढरा पडत नाही आणि ती जळतांना आक्रोलियन नामक फार वाईट वास येणारा वाथु तीपासून उत्पन्न होतो. तो वायू ती मेणबत्ती विझली असतां फार जास्त प्रमाणाने घाण मारतो.
 बैलाच्या चरबीपेक्षां बकऱ्याच्या चरबीत स्टिअरीक आसीड अधिक असते. पुनः ज्या प्राण्याची चरबी असेल त्याचे वय व खाद्य यांवर तिच्यांतील स्टिअरीक आसीडाचे प्रमाण अवलंबून असते. बकऱ्याच्या चरबीचे पातळ होण्याचे उष्णमान ९९° पासून १११° फा. अंश आहे. लेंच बैलाच्या चरबीचे १००° फा: अंश आहे. चरबी हा पदार्थ रशिया, दक्षिण अमेरिका व आस्ट्रेलिया या ठिकाणांहून विक्रीकरितां बाजारांत फार येतो. हल्ली मुंबईस ब्यांडोरा (वांद्रे) स्लाटर हाऊसमध्येही पुष्कळ चरबी तयार होते.
 उपयोगः-चरबी प्रेसमध्ये दाबून स्टिअरीन काढतात; व रसायन रीतीने तिच्यांतील स्टिअरीक व पामिटीक आसिडें काढितात. त्या तीनही पदार्थाच्या मेणबत्त्या होतात.
 २. लार्ड:— हा पदार्थ डुकराची चरबी आहे. हिचे मुख्य घटक स्टिअरीक आसीड, ओलिईक आसीड व ग्लिसराईन हे पदार्थ आहेत, लार्डाच्या दर १०० भागांत ६२ भाग ओलिईन व ३८ भाग स्टिअरीन असते. लार्ड पातळ होण्याचे उष्णमान १०८°-११४° फा. अंश आहे. फ्रेंच व अमेरिकन लोक मेणबत्त्यांच्या कामी या पदार्थाचा उपयोग करितात.