पान:मेणबत्त्या.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४९

 या प्रकाराने काम करण्यांतही स्निग्ध पदार्थावर पांच निरनिराळ्या क्रिया कराव्या लागतात, त्या क्रिया पुढे लिहिल्या आहेत.
 १ ली क्रिया-अम्ल क्रिया ( आसिडीफिकेशन ) हिच्यांत खया चरबी भोवतालची आलबुमेन नामक द्रव्याची जी वेष्टणे असतात त्यांचा सलफ्युरीक आसिडाने नाश करावा लागतो, ही क्रिया फार नाजूक आहे, सबब बेताचे सलफ्युरीक आसीड काळजीपूर्वक स्निग्ध पदार्थात मिळवून हळूहळू ढवळावें, सलफ्युरीक आसीड मिळविण्यापूर्वी तो स्निग्ध पदार्थ पातळ असावा व त्याचे उष्णमान १२०° फा. अंशापेक्षा जास्त नसावे, या मिश्रणाचा रंग किंचित काळसर झाला ह्मणजे ही क्रिया पुरी झाली असे समजावें.
 २री क्रिया-पृथक्करण-हिच्यांत स्निग्ध पदार्थाच्या घटकांचे रसायनरीतीने पृथक्करण करावे लागते, ह्मणून त्यांच्या रसायनप्रमाणाने पुरें होईल इतके अधिक सलफ्युरीक आसीड व पाणी त्यांत मिळवून त्या मिश्रणास २१२° फा. अंशाची उष्णता द्यावी, ह्मणजे त्या स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण होते, या वेळेस त्याचे घटक जे ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें ती रसायनरीतीने निरनिराळी होतात. नंतर खालचे गोड पाणी ( ग्लिसराईनयुक्त पाणी) काढून घ्या ह्मणजे दुसरी क्रिया पुरी झाली.
 ३री क्रिया. भिन्नीकरण- हिच्यांत आलबुमेनची काळी झालेली वेष्टणे जी त्या मिश्रणांत मिश्र असतात ती त्याच्या तळी बसवितात, ग्लिसराईनचे पाणी काढून घेतल्यावर त्या मिश्रणांत अति उष्ण वाफ सोडन उघड्या कढईत ते मिश्रण एक दोन तास शिजवावें झणजे तें काळ द्रव्य जड होऊन त्या मिश्रणाच्या तळी जमते. असे झाले झणजे उष्णता बंद करून ते मिश्रण स्थिर ठेवावे.