पान:मेणबत्त्या.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४३

 नंतर य या भांड्यांत जळका भाग जो शिल्लक रहातो तो काढून दुसऱ्या एका लोखंडी उर्ध्वपातनाच्या भांड्यांत टाकावा. त्यास अति उष्णता देऊन शिल्लक राहिलेल्या स्निग्ध आसिडांची वाफ करून ती उडवून थंड करावी, दोन तीन दिवसांनी ती बरीच घट्ट झाल्यावर वर लिहिल्याप्रमाणे थंड्या व गरम दाबाने त्यांतील स्टिअरीक आसीड निराळे काढावें. यायोगें स्टिअरीक आसीड जरा पण फुकट जात नाही.
 नंतर त्या लोखंडी उर्ध्वपातनाच्या भांड्यांत काळा पदार्थ शिल्लक रहातो. त्याचाही उपयोग ब्ल्याक जपान या पदार्थाप्रमाणे लोखंडास रंग देण्याच्या कामी करतात.
 याप्रमाणे १०० भाग चरबीपासून ६०-६५ भाग स्टिअरीक आसीड, २३--२८ भाग ओलिईक आसीड ( पातळ ) व २ भाग काळा पदार्थ तयार होतो. स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया घडल्याबरोबर त्याचे पृथक्करण होतें ह्मणजे ग्लिसराईन जळून जातें व स्निग्ध आसिडें निराळी होतात. पण या वेळेस त्या स्निग्ध आसिडांचा रंग काळा असतो. तो त्यांचा काळा रंग घालविण्यास त्यांचे उर्ध्वपातन करावे लागते. इतर रीतींनी तयार केलेल्या स्निग्ध आसिडांचा रंग जर काळा असेल तर तो सुधारण्यासही त्या स्निग्ध आसिडांचे पुनः उर्ध्वपातन करावें, तात्पर्य उर्ध्वपातन ही क्रिया या प्रकारांत मुख्य नाही. फक्त मुख्य क्रिया ह्मणजे सल्फ्युरीक आसिडाने स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण करणे एवढीच आहे.
 पाहिजे त्या रीतींनी स्निग्ध आसिडें तयार केलेली असली तरीही पण त्यांचा रंग सुधारणे असल्यास त्यांचे उर्ध्वपातन करावें.

प्रकार २ रा.

.

 ३ या रीतीचा दुसरा प्रकार-या प्रकाराने नुसते पामिटीक आसीड तयार करतात. इंग्लंडांतील प्राइस पेटंट क्यांडल कंपनी व