पान:मेणबत्त्या.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२

 य खाली विस्तवाची उष्णता सुरू करावी व ती य मधील स्निग्ध मा. सिडें २४०° फा. अंशपर्यंत गरम करावी नंतर न भटींत विस्तव करून म नळी लाल झाल्याने तिच्यांतील वाफ अति उष्ण होते. ती अती उष्ण वाफ य मधील स्निग्ध आसिडांत सोडावी. या अति उष्ण वाफेची उष्णता. सुमारे ५६०° फा. अंश असावी ह्मणजे उर्ध्वपातनाच्या कामास सुरवात होते.
  भांड्यांतील स्निग्ध पदार्थाची वाफ होण्यास सुरवात झाली की ट नळीचा कॉक उघडून टाकावा ह्मणजे य मधील बाष्परूप स्निग्ध आसिडें ट मध्ये जाऊन तेथून ख मध्ये प्रवेश करतात, तेथें ख मध्ये तो बाष्परूपपदार्थ थंड होऊन क हौदांत पडतो, शेवटच्या ख नळीत जी थोडी बहुत वाफ थंड न झालेली राहते ती ल या नळीत येऊन पाण्याच्या वर्षावाने थंड होते व खालच्या हौदांत पडते, याप्रमाणे य मधील सर्व स्निग्ध आसिडांची वाफ होऊन ती थंड होऊन क हौदांत पडली आहे. हीच मिश्र स्निग्ध आसिडे त्यांचा पूर्वीचा काळा रंग नाहीसा होऊन आली आहेत.
 जर मूळ स्निग्ध पदार्थ चरबी व ताडाचें तेल हा असेल तर दोन तीन दिवसांनी थंड झाल्यावर ती घट्ट होतात, व याच्याच हलक्या प्रतीच्या मेणबत्त्या करतात, पण उंच प्रतीच्या [ जास्त उष्ण मानावर पातळ होणाऱ्या ] मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करणे असेल तर क मधील स्निग्ध आसिडें मागें लिहिल्याप्रमाणे थंड्या व गरम दाबाने दाबून त्यांतील स्निग्ध आसिड निराळे करून बाकी राहिलेलें घट्ट स्निग्ध आसिड (स्टिअरीक आसीड ) तयार करावे. नंतर त्याचे मोठाले गठे ओतून कोठारांत मेणबत्त्या करण्यास्तव सांठवावे.
 या प्रकारानें काम करण्यांत स्निग्ध पदार्थातील ग्लिसराईन फुकट जातें.