पान:मेणबत्त्या.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८

 या रीतीच्या तिन्ही प्रकारापैकी दरेक प्रकारानें काम करण्याची माहिती खाली दिली आहे.

१ ल्या रीतीचा पहिला प्रकार.


१ली क्रिया-या प्रकाराने स्निग्ध पदार्थाची साबण क्रिया करण्यास त्याच्या दर १०० भागास कळीचा चुना १६ भाग वापरावा. चुना ताजा व पूर्ण भाजलेला असावा व त्यांत खडे वगैरे अशुद्ध पदार्थ बिलकुल नसावे. तो १६ शेर चुना अ हौदांत टाकून त्यांत ३३-३४ शेर गोडे पाणी मिळवून ढवळून एक जीव करावा. नंतर वर लिहिलेल्या स्निग्ध पदार्थाच्या मिश्रणापैकी कोणत्याही एका मिश्रणाचा स्निग्ध पदार्थ १०० शेर ब हौदांत टाकावा. नंतर अ हौदांतील चुन्याचे सर्व पाणी ब हौदांतील स्निग्ध पदार्थात मिळवावे व ब हौदाचें झांकण बंद करावें. नंतर त्यांत लागू केलेल्या नळीतून वाफ सोडून ते मिश्रण शिजवावे. शिजवितांना वरचे वर ते मिश्रण ढवळीत असावें. यास्तव एक लाकडी दांडा आडवा किंवा उभा त्या हौदांत बसवून त्यास लाकडी हात उभे किंवा आडवे लागू करून हातांनी किंवा वाफेनें तो फिरता ठेवावा. म्हणजे ते मिश्रण ढवळले जाते. वाफेऐवजी विस्तवाची उष्णता देणे असेल तर तो ब हौद एका मजबूत भट्टीवर बसवून खाली विस्तवाची उष्णता द्यावी. याप्रमाणे वरचेवर ढवळून तें मिश्रण तीन तास शिजवावे. म्हणजे चुन्याचा साबू तयार होतो. हा साबु पूर्ण शिजला किंवा नाही ते तपासावें. एका लोखंडी पळींत व हौदांत शिजविलेल्या साबूचे थोडेसें मिश्रण काढून थंड करावे. नंतर तो नमुना हातास थंड, कठिण व ठिसूळ (खलबत्त्यांत घालून कुटला असतां त्याची बारीक भुकटी होईल असा) दिसला म्हणजे ही शिजविण्याची क्रिया पूर्ण झाली असे समजावे. नंतर ते मिश्रण स्थिर ठेवावे.