पान:मेणबत्त्या.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६


प्याराफीन मोठ्या हौदांत पडेल अशी त्याची मांडणी करावी. दोन्ही हौदांचे पृष्ठभाग सारख्या पातळीत ह्मणजे सारख्या उंचीवर रहातील अशी योजना करावी. ह्मणजे लहान हौदांतील प्याराफीन मोठया हौदांतील पाण्यावर पडते व लागलीच चोहोकडे पसरतें. जितक्या जाडीचा थर पाहिजे असेल तितकी जाडी त्या थरास आली झणजे लहान हौदांत प्याराफीन सोडण्याचे बंद करावे. नंतर ते मोठ्या हौदांतील प्याराफीन पाण्याच्या थंडीने लवकर घट्ट होते. नंतर त्याच्या वड्या किंवा तुकडे पाहिजे त्या आकाराचे कापून काढून ठेवावे.
  याप्रमाणे कोणत्याही रीतीने प्याराफीन मेणाचे तुकडे घट्ट होऊन तयार झाले आहेत. आता त्यांस गरमी लावून त्यांतील कमी उष्णमानावर पातळ होणारे पदार्थ त्यांतून काढणे आहेत. ती दुसरी क्रिया होय.
 २री क्रिया ―या क्रियेस इंग्रजीत sweating process ह्मणतात. पहिल्या क्रियेंत प्याराफीन पातळ करून त्यांतील पाणी व मळ काढून टाकल्यावर त्याच्या एकसारख्या आकाराच्या वड्या पाडून ठेवल्या आहेत. आतां दुसन्या क्रियेने त्या वड्यांतील कमी उष्णमानावर पातळ होणारे पदार्थ गरमीने काढून टाकून ते स्वच्छ करणे एवढेच काम कसे करावे, त्याची माहिती दिली आहे. हे काम सोईवार होण्यास खाली लिहिलेल्या साधनांची जरूर असते.
 १ वड्या ठेवण्याचे पात्र, २ त्या पात्रांत वड्यांस उष्णता देण्याच साधन, ३ त्या उष्णतेने त्या प्याराफीनमधून निघणारी पातळ द्रव्य त्या पात्रांतून निरळ्या ठिकाणी नेण्याचे साधन, ४ नंतर त्या पात्रांत राहिलेले पांढरें स्वच्छ व घट्ट प्याराफीन पातळ करून पुनः गाळण्यात पाठविण्याचे साधन.