पान:मृच्छकटिक.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )

जोखड मानेवरून फेकून देण्यासाठी उत्सुक होती. अर्थातच त्यासाठी तिने चळवळ चालविली होती.त्यामुळे त्या चळवळीचा नेता आर्यक याला पालक राजानें कैदेत डांबून टाकले.

 या उज्जयिनी नगरींत आणखी एक व्यक्ति होती. तिचे नांव संस्थानक. पण तो श-ष-स हीं अक्षरें सारखीच उच्चारीत असल्यामुळे त्याला ‘शकार' असे नांव लोकांनी दिले होते. ही शकाराची स्वारी होती अर्धवट. पण तो राजाचा मेहुणा असल्यामुळे त्याला भिऊन वागावे लागे. शिवाय त्याच्याकडे नगर-कोतवालाचे काम राजाने दिलेले होते, त्यामुळे त्याच्या हातांत अधिकारहि मोठा आलेला होता.

 उज्जयिनींत वसंत ऋतूंत कामदेवाचा उत्सव साजरा होत असे. मोठमोठे कलावन्त त्यांत भाग घेत. नाणावलेले नर्तक, गवई आणि नाट्यविशारद त्या उत्सवासाठी जमत. ज्याच्या त्याच्या नैपुण्याप्रमाणे त्यांना राजाकडून बिदागी मिळे. श्रीमंत शेठ-सावकारहि या प्रसंगी आपली पैशाची थैली थोडी ढिली करून आपला रसिकपणा प्रकट करीत. परंतु त्यांतहि चारुदत्ताचे वागणें जातिवंत रसिकाला शोभून दिसण्यासारखे असे. एखादी उत्तम चीज ऐकली, एखादे उत्कृष्ट नृत्य पाहिलें कीं या सावकार ब्राह्मणाची रसिकता इतकीं बेभान होऊन जायची की अंगावर असेल तो दागिना सहज उतरला जाऊन त्या कलावन्ताच्या हाती पडायचा ! पण ही चारुदत्ताची रसिकता व्यवहारांत