पान:मृच्छकटिक.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मृच्छकटिक

 शेठ-सावकारांच्या वस्तीत राहणारा चारुदत्त निर्धन झाला होता; पण त्याच्या मनाची श्रीमंती कायम होती. आणि खरे म्हणजे त्याच्या निर्धनपणामुळे ती अधिक खुलून दिसत होती. चारुदत्त नुसता मनानेच श्रीमंत नव्हता, तर दिसायलाहि मोठा देखणा होता, रूपवान होता. आणि तो अत्यंत रसिकहि होता.

 याच नगरांत एक गणिका राहात असे. रूप आणि धन या दोन्ही गोष्टी परमेश्वराने तिला मुक्त हस्ताने दिलेल्या होत्या. आणि त्याबरोबरच तिचे हृदयहि सदगुणांनीं संपन्न करायला तो विसरला नव्हता. या गणिकेचे नांव वसंतसेना. हिची आई धंद्याने वेश्या असल्यामुळे साहजिकच हिचे राहाणें वेश्यावस्तीत होते.

 तो काळ खूप जुना-म्हणजे जेव्हां क्षिप्रा नदीच्या तीरावर भारतीय संस्कृति समृद्धपणे नांदत होती तेव्हांचा होता. क्षिप्रेच्या तीरावरील महाकालाचे उज्जयिनी म्हणून जें सुप्रसिद्ध शहर तीच चारुदत्त आणि वसन्तसेना यांची वास्तव्य-नगरी.

 उज्जयिनीवर त्या काळीं सत्ता होती पालक राजाची. अत्यंत जुलमी असलेला हा राजा दुष्ट आणि दुराचरणीहि होता. अर्थातच प्रजा त्याच्या जुलमाखाली चिरडून भरडून जात असल्यामुळे अत्यंत असंतुष्ट होती; पालकाचे जुलमी