पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 एका बाबींत इराकने फार पुढे मजल मारली आहे आणि ती म्हणजे दळणवळणाचे बाबतींत. बसरा व बगदाद या शहरांमध्ये वैमानिक टपाल आज किती तरी दिवस चालू आहे. कैरोहून विलायती टपाल आणणे व कैरोला विलायती डाक पोहोचविणे ही कामें ही विमानें दर आठवड्यास करतात. कांही उतारूंची सोयही या बसरा-कैरो आकाशमार्गाने होते. पण बसरा ते बगदादपर्यंतचेच भाडे दर उतारूस नऊ पौंड म्हणजे सुमारे एकशेतीस रुपये होते. विमानांत अद्याप पहिला वर्ग, दुसरा वर्ग, साहेबी डबा असे भेदभाव निघाले नाहीत असे खात्रीलायक माहितीवरून कळते.
 या सवलतीने बगदादला टपालच्या चार पेट्या आहेत. एक इराकमधील रेल्वेने जाण्याची; दुसरी समुद्रमार्गे हिंदुस्थान, इंग्लंड इकडे टपाल पाठविण्याची; वैमानिक टपालची तिसरी पेटी आणि दमास्कस, बैरूट, हैफा या बाजूस मोटारींतून जाणाऱ्या टपालची चवथी. भूमध्यसमुद्रावरून इराकांत येणे या मोटारींमुळे फार सोयीचे झाले आहे. ही दहा चाकी मोटार म्हणजे एक आगगाडीचा पहिल्या वर्गाचा डबाच आहे. दर आठवड्यास तिची फेरी होते.
 कैरोहून विमानाने विलायती डाक आणण्याने दोन आठवड्यांची बचत होते. नेहमीचा मार्ग म्हणजे हिंदुस्थानांतून इराणी आखातांत येणाऱ्या आठवड्याच्या बोटीचा. पण वैमानिक व्यवस्था झाल्याने जातांना दोन आठवडे व येतांना दोन आठवडे अशी चार आठवड्यांची काटकसर केल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा झाला आहे. वैमानिक टपालचे दर वेगळे आहेत. तेव्हा पोस्टालाही जादा उत्पन्न होतें.

 इराकमध्ये हिंदी नाणेच चालू आहे. फडणिसी दिवाणांनी नोटा, नाणी वगैरे मिळून सुमारे तीन कोटी रुपये इराकमध्ये खेळत असावेत असा

९२