पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मौलाना-मौलवींचे पार्सल पाठवा

 याच मॉडसाहेबांच्या नांवाने तैग्रीस नदीवर झुलता पूल बांधण्यांत आला आहे. तो तरत्या ताफ्यावर असून जहाजांच्या चाहतुकीच्या वेळीं बाजूस सारतांं यावा अशी व्यवस्था आहे. पूर्वी येथे बोटींवर रचलेला पूल असे तसा दुसराही एक आहेच. पण मॉडसाहेबांचे नांव मोठ्या पुलाला दिले आहे आणि नदीच्या पूर्व बाजूस किनाऱ्यावरून पश्चिम तीरीं जाण्यास त्याचा फार उपयोग आहे. जुने शहर पश्चिम तीरावर असून पूर्वेकडील भागांत बसरा रेल्वेचे स्टेशन व हाय् कमिशनरची कचेरी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत.
 इराणांत श्रीकृष्णमंदिर असल्याचे मागे कळविलेंच आहे. बगदादमध्ये आर्यसमाजाचे एक स्थान असून प्रतिआठवड्यास हवनादि कर्मे होत असतात. नैमित्तिक उत्सवही मोठ्या समारंभाने पार पाडले जातात. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट ही की, कित्येक बगदादनिवासी इस्लामी धर्मानुयायी अशा विशिष्ट प्रसंगी हजर रहातात ! आर्यसमाजाचे ठिकाण अगदी जुन्या भागांत शहरच्या मध्यावर आहे. पण गेल्या आठ वर्षांच्या अवधीत त्यांच्या वाद्यांमुळे अथवा संगीतध्वनीमुळे कोणाही मुसलमानाच्या प्रार्थनेत व्यत्यय आल्याचे किंवा अन्य कारणाने डोकें फिरल्याचे उदाहरण घडून आले नाही. अगदी धर्मलंड होत चालले हे बगदादचे लोक ! त्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी हिंदुस्थानांतील मौलाना-मौलवींचें एक पार्सल पाठविण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे !

 आर्यसमाजाने केलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे हिंदूंसाठी वेगळी स्मशानभूमि मिळविली ही होय. बारीक सारीक सामाजिक अडचणीत आर्यसमाजाचे कार्य प्रशंसनीय होते. हिंदुस्थानांतील धनिकांनी या संस्थेस हातभार लावणे इष्ट आहे.

९१