पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आणि दुसरे राजे फैजल यांचे. शाळेत तीनच चित्रे आणि तीन देशांतील परस्परांशी संबंध नसलेल्या थोर पुरुषांचीं. विलक्षण योगायोग म्हणतात तो असा. वुइल्सनसाहेबांना खडे चारून भुलथापांनी भुलविल्याबद्दल त्यांनी प्राण सोडतांनाही मुत्सद्देगिरींत मुरलेल्यांना शिव्याशाप दिले. राजे फैजल तर बोलून चालून बनावट राजे. नसती पीडा गळ्यांत बांधून घेतल्याबद्दल त्यांना आतां पश्चात्ताप होण्याइतकी विचारशक्ति आली असली तरी, ती मोकळेपणाने (महात्माजींप्रमाणे) कबूल करून उपरणें झटकून टाकण्याची त्यांची तयारी नाही. महात्माजींना वरचेवर ब्रिटिश राजसत्तेवर विश्वास टाकून राहिल्याचा पश्चात्ताप होतच आहे आणि आपला विश्वास अजिबात उडाल्याचे ते पुनः पुनः जाहीर करीत आहेतच. एकूण काय तर या तिन्ही व्यक्ति 'एकाच अग्नीने' भाजून निघाल्या आहेत.

 मद्रासचे ‘नील' पुतळ्याचे प्रकरण वाचकांच्या मनांत ताजे असावें असा समज आहे. उदयोन्मुख राष्ट्राची विचारसरणी सर्वत्र सारखीच असते हे दर्शविणारा बगदादमधील प्रसंग पहा. महायुद्धकाळीं जनरल मॉड या सेनानायकाने बगदादमध्ये प्रवेश केला. बगदाद जिंकलें असें म्हणतां येत नाही, कारण तुर्की फौजेने रक्तपात टाळण्यासाठी अगोदरच माघार घेतली होती. त्याचे स्मारक म्हणून एक मोठा अश्वारूढ पुतळा मॉडसाहेबांच्या नांवें उभारला आहे. इराकी प्रजेने अर्थातच त्याला आणि त्यावरील आलेखाला हरकत घेतली. पण जेथून नगरप्रवेश झाला तेथे तो पुतळा न ठेवता हाय कमिशनरच्या वास्तव्याच्या दारासमोर तो उभारला गेला आहे. त्याला मजबूत असे तारांचे कुंपण असून संरक्षणार्थ शिपाईही नेहमी ठेवले आहेत. सत्याग्रहाची लाट अद्याप इराणी आखातांत आली नाही म्हणून बरें. पण तीही दिवसमानाने पोहोचेल हे खास!

९०