पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकार्यधुरंधरांची कसोटी

यांच्यावर सत्ता ब्रिटिशांचीही चालत नाही किंवा ते अफगाणिस्तानच्या राजालाही मानीत नाहीत! लोकशाहीच्या निर्भेळ स्वातंत्र्याचा मासला किंवा नैसर्गिक राज्यपद्धति येथे या मध्यंतरींच्या प्रांतांत पहावयास मिळेल. त्यांच्याही निरनिराळ्या जाती आहेत आणि प्रत्येक जात स्वतंत्र समजली जाते.
 राजकीय सोईसाठी या स्वातंत्र्यभूमीचे तीन विभाग कल्पिले आहेत. वायव्य सीमेचा बलुचिस्तानकडील भाग मात्र अफगाण सरहद्दीशी लागूनच आहे. तेथे मध्यंतरींचा स्वतंत्र मुलुख असा मुळीच नाही. उपर्युक्त तीन काल्पनिक विभागांपैकी पहिला चित्रळपासून काबूल नदीपर्यंतचा; दुसरा काबूल व कुर्रम या दोन नद्यांमधला; आणि तिसरा वजिरिस्तान हा होय. या प्रत्येक भागांतील लोक निरनिराळे असून त्यांच्याशी ब्रिटिश सरकारचे संबंधही अगदी भिन्न भिन्न आहेत. ब्रिटिशांच्या राजकार्यधुरंधरांचे कौशल्य, त्यांची मुत्सद्देगिरी आणि नेहमीची 'दाणे टाकून कोंबडीं झुजविण्याची' व आपलें घोडे पुढे दामटण्याची वृत्ति ह्या सर्वांचे उत्तम प्रदर्शन या प्रांतांतच झालेलें दिसेल. ब्रिटिश राजकारणपटूंची ही कसोटीच आहे असें म्हणावयास प्रत्यवाय नाही.

  चित्रळ ते काबूल नदीपर्यंतच्या भागांत बरींंच लहान लहान 'स्वतंत्र' संस्थानें व त्यांवरील संस्थानिक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे असे—( १ ) चित्रळचा मेहतर; (२) दीरचे नबाब; (३) स्वात लोकांचा अधिपति मियान गुल. चित्रळ आणि दीर हीं गावांचीं नांवें होत. स्वात ही एक रानटी जात आहे. स्वात नांवाची नदीही पण आहे. आफ्रिदी, मोहमंद, वजिरी, महशुदी, शिनवरी इत्यादि प्रमुख जातींचे लोक आहेत तसेच स्वात जातीचेही पण आहेत. सर्व जातींचे लोक

१५