पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/176

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

दिसले. भिंतीवर काचेचीं कपाटें असून त्यांत निरनिराळ्या कप्प्यांत आजपर्यंत इराणच्या शहांना आलेल्या नजराण्यांपैकी, निवडक वस्तु शिस्तवारीने लावून ठेवल्या आहेत. प्रथमत: तख्त पहावयाचे व त्यास 'पांच कुर्निसात व सात सलाम' करून नंतर इतर भागांकडे वळावयाचें हा तेथील शिरस्ता दिसला; म्हणून प्रथमतः 'तख्त-इ-ताऊस' - मयूरासन -पहाण्यास गेलो. पुराणिकबुवांच्या व्यासपीठासारखें असें हें सिंहासन हत्तीच्या सोंडेसारख्या सहा पायांवर उभारलें असून त्याला चढण्यास समोरून दोन पायऱ्या आहेत. पायऱ्यांमधील भागावर सर्पाची आकृति काढली आहे. सिंहासन आंतून लाकडाचें असून वरती सोन्याचा जाड पत्रा मढविला आहे असें वाटतें. सोन्यावर निळ्या, हिरव्या, पांढऱ्या इत्यादि रंगांत - 'मीना'काम केलें असून रत्नांचा किंवा माणिकमोत्यांचा स्पर्शही झालेला दिसत नाही! नाही म्हणावयास मागील बाजूस म्हणजे आसनावर बसलें असतां पाठ टेकेल त्या भागावर एक मोठा तेज:पुंज हिरा टांगला असून त्याच्या किरणांचें योग्य परावर्तन व्हावें म्हणून बिल्लोरी आरशांचे तुकडे तिरपे ठेवून, हिच्याभोवती वर्तुलाकार सांधले आहेत. आवश्यक तेवढ्या शक्तीच्या विद्युत्प्रकाशाने तो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो; आणि भर उन्हांत धरला तर साक्षात् ‘बालसूर्य' अवतरल्याचा भास होतो, असें सांगतात !

  'तख्त-इ-ताऊस' असें त्या राजासनाला का म्हणतात, याचें कारण मी बरोबरच्या अधिकाऱ्यांना विचारलें; व त्यांनी ज्या मयूराकृति त्या आसनावर दाखविल्या त्या पाहून इराणांत आल्यामुळे मोरांत काय भयंकर फरक पडला असे मला वाटलें! श्रीकृष्णाची चित्रे बंगाली, मारवाडी किंवा पंजाबी वेषांत काढलेली असली तरी तीं ओळखण्यास विशेष पंचाईत पडत नाही. पण हा इराणी शहाच्या आसनावरील

१७०