पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आरसेमहालांतील फसगत

तसे त्यांनाही एकाच महालांत बसावें लागतें. रशियन वकिलाकडे पाठ करून ब्रिटिश प्रतिनिधि बसतो अशी जर कोणाची समजूत असेल, तर ती चुकीची ठरेल. कारण दरबारचे रीतिरिवाज नक्की ठरलेले असून त्यांत 'घरगुती' भांडणाकडे मुळीच लक्ष दिले जात नाही. खरोखर, गेल्या महायुद्धांत एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी टपलेल्या व हल्लीही वरपांगी दोस्तीच्या गोष्टी बोलणाऱ्या, पण आंतून द्वेषाग्नि भडकत असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधि एकाच दावणीनें जेथे बांधले जातात, ती जागा पाहून मनास काय वाटलें असेल?
 पदार्थसंग्रहालयांत प्रवेश करतांच आंतून कोणी तरी आम्हांस भेटण्यासाठी आमच्या सारख्याच पोषाकाने व आमच्याच चालीने येत आहे असें दिसलें. तेथील अधिकाऱ्यांनी मोहोरबंद कुलप माझ्याच देखत उघडलें व त्यांच्या समवेतच मी आंत प्रवेश केला; असे असतां आंतून हीं माणसे कशी आली? ही भुताटकी तर नसेलना? अशा नाना शंका एका निमिषमात्रांत येऊन गेल्या. आम्ही जसजसे जवळ जाऊं लागलों, तसतशी ती अदृश्य भागांतून आलेली मंडळीही जवळ येऊं लागली; कोणी का असेनात, शिष्टाचाराप्रमाणे हस्तांदोलन करून 'प्रातमींलना'प्रीत्यर्थ आनंद प्रदर्शित करावा म्हणून हात पुढे केला. तों तो एका आरशावर खट्कन् आपटला! माझी भांबावलेली मुद्रा व झालेली फजिती पाहून बरोबरीचे अधिकारी हसत होते! त्यांना आपल्या या भुतांशी भेटण्याचा प्रसंग वारंवार यावयाचा, त्यामुळे त्याचें कांहीच वाटलें नाही.

 त्या विस्तृत दालनांत भिंतीभर आरसे लावले असल्याने ही फसगत झाली. एखाद्या प्रदर्शनांत दुकानाची मांडणी करतात त्याप्रमाणें दोन्ही बाजूंस आडवीं दुकानेंच लावली आहेत, असे आंत जातांक्षणीच

१६९