पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मयूरासनांतील मौल्यवान् माणकें

मोर किती तरी रोडलेला–म्हणजे हत्ती जाऊन बोका रहावा अशापैकी झालेला! त्याला पिसारा तर मुळीच नाही, तुरा नाही, नीलकंठ नाही, कांहीच नाही! लहान मुली खेळण्यासाठी कापडाच्या तिकोनी ‘चिमण्या' करतात, तशाच ढोबळ आकाराचे दोन मोर सिंहासनाच्या मागील बाजूस बसविले होते आणि म्हणूनच त्या सिंहासनाला ‘तख्त-इ-ताऊस' (मयूराचें आसन) असें म्हणतात!
 तेथेच दुसरेंही एक राजासन होतें. त्याला ‘तख्त-इ-नादिर' ऊर्फ ‘नादिरशहाचें तख्त' असे म्हणतात. कारण नादिरशहाने १७३९त दिल्ली लुटली तेव्हा तें तेथून नेलें. त्यावर मात्र रत्नें व माणिकमोतीं खेचून भरलेलीं आहेत. दिल्लीच्या बादशहांचें मयूरासन नादिरशहाने इराणांत नेलें असे जे आपण इतिहासांत वाचतों, तें मयूरासन हेंच! याच्या मागील भागावरील नक्षींत मोठमोठे पाचू सोन्याच्या कोंदणांत बसविलेले आहेत आणि ते मयूरपिच्छावरील डोळ्याएवढे व डोळ्यासारखे दिसतात. त्याच्या अजूबाजूने वर्तुलाकार अथवा कमानी काढून लाल, हिरे व माणकें हीं बसवलेलीं दिसतात. सर्व आसन सोन्याचें असून प्रामुख्याने डोळ्यांत भरणारे एवढाले मोठे पाचू पहातांच त्याच्या बिनमोलपणाची कल्पना येते.
 हें सिंहासन म्हणजे एक मोठी उंच खुर्चीच आहे. वर चढण्यासाठी त्याला दोन पायऱ्या आहेत; आणि खालच्या पायरीवर एक सिंहाचा छावा रत्नांनी विभूषित असा काढला आहे. चित्त्याच्या आंगावर असतात तसे ठिपके या सिंहावर कसे आले हें कोडें सुटत नाही. का तें व्याघ्रासनच म्हणावे?

 ह्या आसनावरील उंची किनखापाने मढविलेल्या बसण्याच्या गाद्या, आसन ठेवण्यासाठी मखमलीची बैठक आणि रत्नांची रेलचेल व त्यांची

१७१