पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/162

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखातली मुशाफरी

  इराणांत गेल्यापासून मला बऱ्याच अधिकाऱ्यांना व प्रमुख नागरिकांना भेटण्याचा प्रसंग आला. पण एकाही वेळीं चुकून देखील 'हिंदु का मुसलमान?' अशा प्रकारचा धर्मासंबंधी प्रश्न निघाला नव्हता. इराणी सफर संपवितांना मात्र एक गंमतीचा अनुभव आला. इंग्रज सरकारच्या बड्या वकिलास भेटावयास गेलो असता त्यांनी पहिला प्रश्न - 'तुम्ही कोण?' असा केला. नामपत्रिका पुढे पाठविली असतां आणि परिचयपत्रांत सर्व खुलासा असूनही असा प्रश्न का उद्भवला हे मला कळेना. तेव्हा स्वतःसंबंधी थोडीशी माहिती मी त्यांना सांगितली. तेवढ्याने साहेबांचे समाधान झालें नाही. म्हणून त्यांनी स्पष्टपणें खिश्चन, मुसलमान का हिंदु तें जाणण्याची इच्छा दर्शवली. त्याच्याही पुढे जाऊन हिंदूंपैकी कोणती जात हेंही त्यांना विचारावेसे वाटलें. हिंदु, त्यांतून केसरीचा हिंदु प्रतिनिधी, मुसलमानी देशांत निःशंकपणे वावरतो कसा याचें त्यांना कोडें पडलें. हिंदी परिस्थितीची ओळख पूर्णपणें असल्याने त्यांचे कुतूहल मुळीच थांबलें नाही. हिंदुस्थानांतील ‘ब्राह्मण' इतका खुलासाही त्यांना पुरेसा वाटेना. "कोणत्या भागांतील??" हा त्यांचा सवाल तत्काळ पुढें आलाच. "मुंबईकडील" हे उत्तर त्यांना समाधाकारक न वाटल्याने "कोणता जिल्हा?" म्हणून त्यांनी विचारलें. "पुणे" असे माझें उत्तर ऐकतांच इंग्रज वकील हंसत हंसत एक हात विजारीच्या गोमुखींत घालून तोंडांतील 'पाइप' सावरीत म्हणाले, "अस्सं. एकंदरीत तुम्ही पुण्याचे ब्राह्मण आहां म्हणावयाचें. ठीक, ठीक." त्यांच्या हास्यांत काय अर्थ होता हें त्यांच्या नेत्रद्वयांत स्पष्ट दिसे. वाचकांना त्याची जाणीव पाहिजे असल्यास हिंदुस्थान सरकारच्या गुप्त खात्यांत 'पुण्यांतील ब्राह्मणां'ना काय महत्त्व आहे तें पहावें.

१५६