पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/160

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

किती त्रासदायक वाटले असतील ? आपणांस उद्यानाची आवश्यकता म्हणजे श्रीमंती चैन वाटते; पण मनुष्याचें मन कार्यमग्न करण्यासाठी नैसर्गिक हिरव्या रंगाचा उपयोग किती होतो हें समजण्यास अशा वाळवंटांतील वनस्पतिविहीन प्रदेशांत किंचित्काल वास्तव्य करावें. रोजचें जेवण जात नाही, कांही विचार सुचत नाही किंवा अमुक काम करावें अशी इच्छाही होत नाही ! हा प्रभाव केवळ रूक्षतेचा !
 दुजदाबहून आठवड्यांतून दोनदा क्वेट्टयास गाड्या जातात. प्रचलित समय हा मक्केच्या यात्रेचा हंगाम असल्याने अलोट गर्दी जमली होती. आणि त्या गाडीस - 'यात्रेकरूंची खास गाडी' असेंच म्हणत. कारण सबंध गाडींत तीन उतारू प्रवासी होते. बाकीचे एकजात इराणी मक्केला निघालेले असून आपण गाडी विकत घेतल्याप्रमाणे इतर कोणासही आपल्या डब्यांत शिरूं देत नसत. अल्लाचा गजर, निमाज पढण्याची आतुरता, गाडी चालू झाली तरी पैगंबराची लागलेली एकतानता न सोडण्याची वेडी बेपर्वाई, चालत्या गाडीत चढण्याची धडपड हीं सर्व प्रत्येक स्टेशनवर पहावयास मिळत! आगगाडी कधी बापजन्मींही पाहिली नसल्याने आणि धर्मावर अलोट श्रद्धा असल्याने आपण निमाज पढत आहोंत हें पाहून गाडी पुढे जाणार नाही अशी त्यांची दृढ समजूत असे. निदान ठराविक वेळीं तरी प्रार्थनेसाठी गाडी थांबेल असा त्यांचा विश्वास असे. परंतु काफरांनी बनवलेली आगगाडी पैगंबराविषयी बेफिकीर असल्यास नवल कोणते?
 अशा हाज यात्रेकरूंच्या समवेत एक हिंदी इसम प्रवास करतो याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना राहून राहून आश्चर्य वाटे! कारण तिकिट तपासण्यास किंवा अन्य कार्यासाठी ते डब्यांत शिरण्याचा प्रयत्न करू लागले की, सर्व उतारू एकत्र होऊन त्यांना खाली ढकलून