Jump to content

पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टोळधाडीचा उपद्रव

 धर्मवेड्या अडाणी आणि खेडवळ लोकांत मिसळण्यास उपवचनांचा उपयोग झाला; त्याजबरोबर 'सलामुन अलेकुम' आणि 'खुदाहाफिझ' यांचाही मुक्तकंठाने उपयोग केला. पहिलें वचन प्रथम भेटीचे वेळीं उच्चारावयाचें. त्याचा अर्थ सलाम असा आहे. दुसरें म्हणजे खुदा तुमचे कल्याण करो अशा अर्थाचें वचन निरोप घेतांना तोंडांतून काढावयाचे असते.
 पाश्चिमात्य सुधारणा स्त्रीवर्गांत चोहोकडे फैलावत आहेत. अगदी दूर अशा खेड्याच्या ठिकाणी स्त्रियांचे तलम मोजे किंवा उंच टाचांचे बूट आढळत नसले तरी मोठमोठ्या गावीं स्त्रियांची प्रगति सुधारणेकडे फार आहे हें खरें. पुरुषवर्ग त्या मानाने मागें आहे. साधी पेहेलवी टोपी देखील सर्वत्र संमत नसून कित्येक ठिकाणी तिजबद्दल तिरस्कार दिसून आला. मात्र सूत किंवा लोकर कातणें, रंगवून वस्त्रे विणणें हीं कामें ज्या त्या खेड्यासाठी तेथील लोकच करीत.

 दुजदाब हें नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेचें स्टेशन आहे. क्वेटट्यापासून ४५६ मैलांवरील हें ठिकाण इराणी हद्दींत असलें तरी सर्वस्वी हिंदी जनतेने वसविलें आहे. गेल्या बारा पंधरा वर्षांतच तें उद्भवलें असल्याने अगदी नवें दिसतें. रूक्षपणांत या नवीन गावाची बरोबरी मारवाडांतील एखादें खेडें करूं शकेल. आजूबाजूस डोंगर असले तरी इतर शोभा कांहीच नाही. रेल्वेंतून इराणी व्यापारासाठी येणारा माल येथेच उतरत असल्याने इराणी सरकारचे मोठें उत्पन्न या गावीं होतें. पंजाबी व शीख व्यापारी येथे पुष्कळ आहेत. गेल्या महायुद्धांत हिंदी सैन्याचे तें एक मोठें ठाणें होतें. मी त्या गावीं असतांना टोळधाडीचा त्रास सुरू झाला होता. अगोदर गाव रूक्ष, त्यांत टोळधाड आलेली, तेव्हा जीं काय थोडीं हिरवीं पानें बागेंत असत तींही खाऊन फन्ना करून टाकणारे टोळ किती त्रासदायक वाटले असतील?

१५३