Jump to content

पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

बगदाद शहरापासून सहासात मैलांवर ही वैमानिक छावणी आहे; तेथे काम करणारांस तेथेच रहाण्यास जागा मिळावी हें कोणालाही मान्य होईल आणि पूर्वी मोफत खोल्याही असत. पण 'कूर्मोङ्गानीव सर्वशः' याप्रमाणे हळूहळू या सवलती आपलें चंबुगवाळें आटोपूं लागल्या. खोल्यांना भाडें सुरू झालें, दिवाबत्तीचा खर्च वेगळा आला, पाणीपट्टी नवी लादली आणि त्यांवर ताण म्हणजे भंग्याची व्यवस्था ज्याची त्यानें करावी असें कलम घुसडून दिलें! कांटेकोर दृष्टीचा नमुना म्हणून असेंही फर्माविण्यांत आलें की, सपत्नीक कुटुंबांत मुलें जसजशी वाढतील त्या मानाने वरील सर्व कर वाढविले जातील!
 इराकमध्ये भंग्यांची आवश्यकता भांसू नये अशा पद्धतीचे पण घाणेरडे शौचकूप आहेत. त्यामुळे रेल्वेसाठी लागणारे भंगी हिंदुस्थानांतून आणावे लागले आणि ज्या ज्या ठिकाणीं नव्या अमलाखाली वस्ती झाली तेथील स्वच्छतेसाठी हिंदी भंग्यांची भरती करण्यांत आली. अद्यापही हिंदुस्थानांतून प्रतिवर्षी किती तरी भंगी इराकमध्ये पाठविले जातात. जंसे कांही या गलिच्छ कार्यांचे कंत्राट हिंदी राष्ट्राने घेतलें आहे! इतर खात्यांत जबाबदारीची कामें करणारे लोक स्थानिक जनतेंत आढळले, तरी भंग्यांची भरती हिंदुस्थानांतून कांही वर्षे करीत राहिलें पाहिजे असा शेरा इराक रेल्वेसंबंधी एका इंग्रजी तज्ज्ञाने दिला आहे. इराकी भंगी तयार करण्याचे प्रयत्न समाधानकारक झाले नसल्याने हिंदुस्थानांतून पुरवठा करण्याचा सल्ला इराक सरकारास त्या भल्या इंग्रज अधिकाऱ्याने दिला. या उपायाने हिंदी राष्ट्राचा लौकिक परदेशांत चांगलाच वाढेल, नव्हें काय?

 वर सांगितल्याप्रमाणे पूर्वी दिलेल्या सवलती रद्द करून किंवा दुसऱ्या शब्दांत बोलावयाचे तर नवीन अडचणी उपस्थित करून,

१००