पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साम्राज्य सरकारचा सापत्नभाव

कमिशनरच्या मुखांतून बाहेर पडले. परंतु, प्रत्यक्ष कृति कांहीशी वेगळी दिसली. हिंदी अधिकाऱ्यांच्या जागीं इंग्रजांना नेमलें असल्याचें बऱ्याच वेळां दिसून आलें. आणि ब्रिटिशांचा पगार निराळा, त्यांच्या सवलती वेगळ्या, त्यांना अडचणी कमी, असा सापत्नभाव असूनही इराक रेल्वेखात्यांत केवळ ब्रिटिश अधिकारी वर्गासाठी सुमारे सव्वापांच लाख रुपये खास राखून ठेवण्यात आले आहेत. प्रॉव्हिडंट फंडाची सोय हिंदी जनतेला नको असते व केवळ गोऱ्या बाळांनाच ती आवश्यक आहे अशी ब्रिटिश सत्ताधीशांची समजूत असल्यास न कळे ! वर जी सव्वापांच लक्षांची रक्कम सांगितली, ती बाजूला काढून ठेवण्यांत दर्शविलेली हिशेबी हातचलाखी स्पष्टपणे सांगतां येत नाही. पण ती फक्त ब्रिटिशांपुरतीच आहे हे मात्र निश्चित ! आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग परदेशीं घालवून उतारवयांत बेकार होऊन स्वदेशी परतणाऱ्या हिंदी बांधवांस काय वाटत असेल बरें ? त्यांनी काय करावे ?

 इराकी सरकारच्या छत्राखालील प्रकार पाहिल्यावर साम्राज्य छत्राखालचें दुसरे चित्रही पाहिलें पाहिजे. बगदाद हें पौर्वात्य भागांतील साम्राज्यवैमानिक दलाचे मुख्य ठिकाण मानण्यांत येतें. काबूलला जाण्यासाठी कांही मोठीं विमानें येथूनच पेशावरला गेली होती हें वाचकांना विदित असेलच. या वैमानिक छावणीत बऱ्याच हिंदी मंडळींना काम आहे आणि हें खातें इंग्लंडमधील मंत्रिमंडळाच्या ताब्यात असल्याने तेथे कांही अधिक सोयी असाव्यात अशी कोणाची समजूत झाल्यास तीही सपशेल चुकीची ठरेल. उलटपक्षी 'अडल्या नारायणा'प्रमाणे अधिकाऱ्यांच्या लहरीस येतील त्या अटी मान्य केल्याविना चालत नाही, अशी अवस्था वैमानिक खात्यांत काम करणाऱ्या हिंदी कामगारांची आहे. उदाहरणासाठीं, अगदी थोडक्यांत पण विचित्र अशा अटी देणें इष्ट आहे,

९९