Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंवा बायकोला गुलाम म्हणून वागवणारा नाहीये. त्यामुळे आपल्यालाही फायदा होतो. आणि इतर बायकांचाही काही फायदा होत असेल. म्हणून येणारी जाणारी जी माणसं होती त्यांच्याशी सिंपथीनं बोलायचं, घरगुती प्रश्न मिटवायचे, हे काम मी करत होते. तेवढंच मला कळत होतं, तेवढंच काम मी करत होते. का, तर माझ्याकडे वेळ पण नव्हता तेवढं करायला. मग 'मराठा'मध्ये हे काम करत असताना सामाजिक काम जेव्हा खूप वाढायला लागलं तेव्हा असं वाटलं का आता काय करायचं? ६६ मधल्या मोर्चात मी दोन तीन महिन्यांची धाकट्या मुलीच्या वेळेला प्रेग्नंट होते. यानंतर ७-८ महिन्यांनी बाबूराव सामंत त्यांच्याबरोबर कोणीतरी ३/४ माणसं आणखी घेऊन आमच्याकडे आले. आणि त्यांनी असं सांगितलं की, भाभी, आम्हांला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हमीद आता सामाजिक कामामध्ये जाणार आहे. तर तुमची संमती पाहिजे. हमीद तुमच्याशी आधी याबद्दल बोलला नव्हता का काही? 'नाही', त्यांना असं वाटलं असेल, की चार लोकांनी मेहरूला सांगितलं असं तर ती ऐकेल. नाहीतर वाद होणारच ना! पण त्यांनी मांडताना चांगलं मांडलं. ते म्हणाले, "बघा, तुमच्या घराला खर्च भागावायला किती रुपये हवेत? तुमच्याकडे जो पगार येतो तो पुरतो का?" 'नाही.' 'आम्ही पुरवतो.' तुमच्याकडे जबाबदारी खूप आहे. तर हमीदकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? किती पैसे मिळवले पाहिजेत त्याने? हमीद होतेच तिथे. सगळेच होते. मी म्हटलं माझं घर चालवायला माझा पगार ठीकाय. त्यांच्या घरी मदत जेबढी करता येईल तेवढी मी करेन. आणि यांना जर नोकरी सोडून हे काम करायचं असेल तर निदान त्यांचा खर्च त्यांनी काढावा. माझ्या पगारातून त्यांचा खर्च वेगळा देता येईल याची शक्यता नाही, मग उगाच वाद होतो. भांडणं होतात. आणि त्यांनाही असं वाटायला नको का मी बायकोवर अवलंबून आहे. त्यांनीही हे कबूल केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी 'मराठा'तली नोकरी सोडली. पण त्यांना पैसे द्यायची काय सोय केली होती बाबूराव सामंत. वगैरेंनी? ते मी विचारलेलं नाही. एकदा तर गंमत झाली. हे झाल्यानंतर काही दिवसांनी कपाटात मी बघताना मला थोडेसे पैसे मिळाले! त्यांच्या ड्रॉवरमध्ये. माझ्या डोक्यात असं आलं की हे एवढे पैसे इथं आले कुठून? आपल्याला दोनशे पगार मिळतो. हे तर जास्त दिसतात. कुठून आले? मी यांना विचारलं, तर यांनी काही मला सांगितलं नाही. सगळं काही सांगितलंच पाहिजे असं नाही, म्हणाले. पण मला काही बरोबर वाटलं नाही. मी शहासाहेबांकडे धावत गेले. त्या वेळी शहासाहेबांची, नगरकरांची- माझी ओळख झालेली होती,

८० : मी भरून पावले आहे