पान:मी भरून पावले आहे.pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या वेळी असं झालं की मोर्चा काढायचा, मोर्चा काढायचा. पण मोर्चा म्हणजे काय? कशाला काढतात? बायकांचा काढतात. मुसलमान बायकांचा काढतात? तर त्या वेळी असं होतं की बायकांचा मोर्चा म्हणजे बायकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं. ही फार मोठी गोष्ट आहे. इतिहासामध्ये घडलेली पहिली ऐतिहासिक बाब आहे. कुठलाही मुस्लिम इतिहास तुम्ही घेतला तर कुठल्याही मुसलमानांनी असा बायकांचा महत्त्वाचा मुद्दा घेऊन मोर्चा काढलेला दिसणार नाही. हमीद दलवाई असं संगठन करणारा पहिलाच आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व आम्हांला त्या काळामध्ये माहीत नव्हतं. समान नागरी कायदा आम्हांला त्या काळामध्ये माहिती नव्हता. कधी मला असं वाटलंही नाही की आपण मोर्चात जातो तर त्याची माहिती आपण काढू या. लोकांनी आपल्याला विचारल्यानंतर काय माहिती नाही म्हणायचं? मग दलवाई म्हणाले, बायकांचा मोर्चा निघतो तर तूही चल. मी पण तयार झाले.
 आमच्या हातात फलक होते. आता आठवत पण नाही, कुठून आम्ही मोर्चा काढला. फलक काय होते? “समान नागरी कायदा झाला पाहिजे", "जबानी तलाक बंद झाला पाहिजे", "मुल्लांचा धिक्कार असो". असे फलक नुसते घ्यायचे. गुपचूप. मृणाल गोरे आमच्या बरोबर होत्या. बाकी कोणी लोक नव्हते. भाई वैद्य म्हणायला लागले की तू आम्हांला घेऊन मोर्चेबिर्चे काढू नको. हिंदूंना बरोबर घेऊन तू कसलंही काम करू नकोस. आम्ही तुझ्या मागं राहू. तुला पाहिजे ती मदत करू. पण हे तुझं काम मुस्लिमांपुरतंच मर्यादित ठेव. मग दोन माणसं असली तरी त्या दोन माणसांना घेऊन तू मोर्चा काढ. मग मोर्चात किती स्त्रिया? सात. सात स्त्रिया म्हणजे खूप झालं. त्या काळामध्ये हा ऐतिहासिक मोर्चा समजला गेला. मला वाटतं आम्ही मंत्रालयामध्ये गेलो. वसंतराव नाईक चीफ मिनिस्टर होते. ते निवेदन आम्ही दिलं. घरी आलो. सगळ्यांनी वाहवा केली. तरी कळलं नाही. 'अरे, तुम्ही मोर्चामध्ये जाऊन आलात! कशाला गेलात?' आपल्याला काहीही कळलं नाही. अशी मी मोर्चामध्ये जाऊन आले. पहिला मोर्चा आणि समजूत अशी झाली की मोर्चा म्हणजे काहीच नसतं. जायचं नि यायचं. गडबड नाही, काही नाही.

 या मोर्चाबद्दल पेपरमध्ये लिहून खूप आलं. पण मला मराठी येत नसल्यामुळे मी पेपर वाचलेला नव्हता. पण खूप गाजावाजा झाला. लोकांनी शाब्बासकी दिली आणि वाटायला लागलं की दलवाई काही तरी काम करतात. गंमत एकच माझ्या लक्षात यायची. माझ्या माहेरी मला फ्रीडम नव्हतं. अन् या माणसानं मला फुलफ्रीडम दिलं होतं. हा माणूस बायकांच्या फेवरमध्ये आहे.

मी भरून पावले आहे : ७९