भाई वैद्य राष्ट्र सेवादलात काम करणारे होते. यदुनाथ थत्ते, बाबा आढाव असे सगळे व आज आमचे जे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सभासद आहेत ती सगळी मुसलमान मुलं भाईंच्या माहितीतली होती. तर हमीद असं म्हणायचे, “मला काही तरी करावंसं वाटतंय. पण मला काही सुचत नाही. मला दिशा पाहिजे." तर हे लोक म्हणायचे, "तू हा विषय बोलतोस तो बरोबर आहे. ही मांडणी करतोस ती बरोबरच आहे. मग आपण काय करायचं?" भाईंनी पहिली मीटिंग घेतली. ते म्हणाले, "हमीद लेखक म्हणून चांगला आहे. पण त्याला बोलायला जमत नाही. आमची जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हा या मुलांना आम्ही जमा केलं. मीटिंग घेतली, तर हमीदना काही बोलता येईना.” हमीद म्हणाले, "मी काय बोलू? मला काही सुचत नाही." त्यावर भाईंनी सांगितलं की तुझ्या जे मनात येईल ते सांग आणि त्यांनी ते सांगितलं. अशा ३-४ मीटिंग घेतल्या. तेव्हा त्यांनी आपल्या पुढचा प्रश्न चांगल्या रीतीने मांडायला सुरुवात केली. त्यानंतर काही तरी करायचंय, काहीतरी प्रोग्रॅम घ्यायचाय, काय घ्यायचा? प्रत्येकाच्या सजेशन्स वेगळ्या आल्या. मग असं ठरलं की आपण एक मोर्चा काढू या महिलांसाठी. यात मागणी काय घालायची? तर समान नागरी कायद्याची. सवत बंदीचा कायदा झालाच पाहिजे, जबानी तलाक रद्द करायला पाहिजे अशी. खरं म्हटलं तर या मागणीच्या मागे त्यांची एक प्रमुख भूमिका होती ती अशी की, आपल्या सार्वजनिक जीवनात, सामाजिक क्षेत्रामध्ये धर्माला फार महत्त्व आहे. हा जो धर्माचा प्रभाव आहे आपल्या जीवनावर, तो हळूहळू कमी केला पाहिजे. तो कसा कमी करायचा? कुरुंदकर पण हेच म्हणायचे. सेक्युलॅरिझमचं उद्दिष्ट काय आहे? धर्माचा आपल्या जीवनावर जो परिणाम आहे तो हळूहळू कसा कमी करायचा? तर त्या दृष्टीनं हा जो मोर्चा आहे तो पहिली पायरी समजला गेला पाहिजे. आता हे मी जे बोलतेय ते मला आज कळतंय. त्या वेळेला कळत नव्हतं.