नि घरी आल्यावर मला सांगायचे, आज मला बरं वाटलं. मी त्याच्या घरी गेलो होतो म्हणून. त्याच्या फॅमिलीबरोबर मी जेवलो. तर मी म्हणायची नं, अहो, किती घाण असते तिकडे. ते म्हणायचे, “मेहरू, मला ती घाण वाटत नाही ग. ती त्यांच्यात गुरफटलेली माणसं, मला त्यांच्यात झोपल्याशिवाय कशी कळणार? घाणीमध्ये ही माणसं कशी राहतात, हे कसं कळणार?" त्या प्रेमाने ते तिकडं जात असत.
६२ मध्ये आम्ही पाकिस्तानला गेलो. गेल्यानंतर त्यांनी तिथं मुसलमानांची माहिती काढायला सुरुवात केली. तिथले मुसलमान खातात, पितात काय, संस्कृती कशी आहे? राहातात कसे? कसला षौक आहे? कसलं पॉलिटिक्स त्यांचं आहे? बायकांना किती स्वातंत्र्य आहे? ही सगळी माहिती काढायची त्यांना सवयच लागलेली. त्याच्यावर त्यांनी मुंबईला आल्यावर लेख लिहिले. तेव्हा ते मराठामध्ये छापले. मला कुणी तरी असं सांगितलं की चीफ एडिटर त्यांना असं म्हणाला, "हमीद, हा विषय तुझा फार चांगला आहे. तू खूप चांगला रंगवून लिहिलेला आहेस. तुला याच्यात रुची दिसतेय. तू जर हा विषय घेऊन पुढे गेलास तर तुझं भाग्य उजळेल.” असं त्यांनी तीन-चार वेळा सांगितलं. काश्मीरला जेव्हा गडबड झाली तेव्हा गेले काश्मीरला, असे न विचारता न सांगता. चार-पाच लेख त्याच्यावर लिहिले. खूप गाजले ते लेख. आम्हांला ते काश्मीरला गेलेले माहितीही नाही. त्यांचे लेख आल्यावर सगळे म्हणायला लागले, हमीद काश्मीरला गेला आहे. घरात आम्हांला काळजी. आम्हांला समजेना हा माणूस कुठे गेला. दंगल सुरू झाली तर काय करायचं? आणि आले. तेव्हा मी म्हटलं, “बाबा, तुम्ही हे लेख-बिख लिहिले. पण अत्रे काय तुम्हांला ठेवणार नाहीत." पण अत्रे त्यांना खूप चांगले म्हणायचे. त्यांनी काय केलं? असं मानलंच नाही की हमीदनं मला विचारलं नाही. मला न विचारताच, परमिशन न घेता तो गेला आणि मारे मोठेपणानं लिहिलं. असं त्यांनी केलं नाही. त्यांनी कौतुकच केलं, की हा आमचा प्रतिनिधी आहे. तो तिकडे गेला. एवढी छान माहिती काढली. एवढी रिस्क घेऊन, म्हणून मग त्यांनी ह्यांना अशीही ऑफर दिली की तू इथंच काम कर. नि काम करायचं नसलं तरी मी तुला पगारी रजा देईन. तू तुझं काम कर. असं अत्रेंनी खूप सांभाळून घेतलं. पाच वर्षं त्यांनी काम केलं, म्हणजे अत्रेंनी त्यांना सांभाळलं म्हणून केलं. ह्यांचं लक्ष काय त्यांच्या कामाकडे नव्हतं. ते सारखे धावायचे. इकडे धाव, तिकडे धाव. ही माहिती काढ, ती माहिती काढ. पण अत्रेही त्याच क्षेत्रातले होते. कौतुक करणारे होते. मराठात काम करताना हे सारखे लिहायचे, पेपर आपल्या हातातच,