Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आता गावात बरीच उनाड मुलं असायची, अडाणी. ती घरात बरोबर वागायची नाहीत. तर त्या सगळ्यांची जबाबदारी यांनी घेतली होती. सगळ्यांना बरोबर घ्यायचे. गळ्यात हात घालून फिरायचे. आपली कामं सांगायचे. आणि सगळे म्हणायचे, काय हमीदखान आहे? त्या मुलांना घेऊन फिरतो. पण त्या मुलांना असं वाटायचं का हमीदखान एवढा मोठा आहे तरी तो आम्हांला घेऊन फिरतो. आमच्या गळ्यात हात घालतो. आमच्याशी मैत्री ठेवतो. पण ह्यांचा हेतू वेगळा असायचा. मग त्यांना नोकऱ्या लावायचे. कोणाला मुंबईमध्ये लावली, कोणाला गावामध्ये लावली. कुणाला बँकेमध्ये लावली आणि पहिली तारीख झाली ना की त्यांचा पगार घ्यायला उभे राहायचे. चल, एवढे पैसे दे. कशाला? तुझ्या घरी तुझ्या आई-वडिलांना पाठवायला. असे पैसे घ्यायचे. स्वतः एम.ओ. करून पोचते करायचे. आणि त्यांना विचारायचे अमूकने पैसे पाठवले ना? तुम्हांला मिळाले ना? आणि दर महिन्याला हे बघण्याचं काम माझं. म्हणायचे, “गावाची जबाबदारी माझी आहे. मेहरू, ही मुलं उनाड वागतात. त्यांना सुधारण्याचं काम केलं नाही तर काही उपयोग नाही."

 जास्त करून मुसलमान मुलंच भोवती. कारण त्यांचं काम त्यांच्यातच होतं ना? हिंदूंमध्ये काम करणारे खूपजण होते. मुसलमानात काम करणारं कोणी नसायचं. त्यामुळे अशा त-हेनं ते काम करायचे. सगळी त्यांची ऐट खपवून घ्यायची, कोणाला वाईट बोलायचे नाहीत. आमच्याकडे महंमददांचा धाकटा भाऊ अमीर यायचा नं, त्याला तर थोडीशी चोरीमारी सुद्धा करायची सवय होती. तो असा बसलेला असायचा नंतर हे असे घड्याळ काढून ठेवायचे. मग म्हणायचे, "बघ, हे घड्याळ मी असं इथं काढून ठेवलेलं आहे. मी जरा संडासला जाऊन येतो.” तो म्हणायचा, 'बघा काकी, हमीदकाका कसे माझं नाव घेतात. मी काय घड्याळ घेणारे का?' असा त्यांचा जोक पण व्हायचा. त्याच्या गळ्यात हात घालून फिरायचे. खूप लोभ असायचा त्याच्यावर. तो उनाडक्या करायचा. काही कामधंदा करायचा नाही. फॅमिली बघायचा नाही. असं असलं तरी त्याला यांनी खूप जवळ केलं. त्याच्या घरात खाटेवर मळके कपडे पडलेले असत. तिथं मुलं हागायची, मुतायची. पण हे कुठंही जायचं नसेल न तर मी अमीरच्या घरी जातो म्हणायचे. दिवसभर त्याच्या घरी त्या पलंगावर लोळायचे. त्याच्या बायकोला सांगायचे. हे घे पैसे. म्हावरा आण. चांगली हलदोनी कर. चांगलं जेवण कर. आपण जेवू या. जेवण केल्यानंतर त्या मुलांना, त्याला घेऊन जेवायचे

मी भरून पावले आहे : ७५