पान:मी भरून पावले आहे.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपटुडेट राहायला पाहिजे. एकदा मी मार्क केलं. दुसऱ्या वेळेला माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, “हे काय, इतके घाणेरडे कपडे, माझ्याबरोबर येण्यासाठी? समजता काय स्वतःला? तुम्ही काय स्वतःला फार हुशार समजता का काय? अजिबात खपणार नाही म्हटलं. मी तुमच्याबरोबर अजिबात येणार नाही कुठेही. मलाही असं वाटतं की माझा नवरा सगळ्यात उठून चांगला दिसावा म्हणून. तुम्हांला जर तेवढी किंमत नसेल तर मला तुमच्याबरोबर यायचं नाही.” ते म्हणायचे, "नाही ग, मी मुद्दाम असं नाही करत. पण आपण त्या दिवशी काढले की नाही? ठीकाय, मी हे घालत नाही. आता तू मला काढून दे कपडे. ते मी घालत जाईन. असं म्हटल्यावर मी दुसऱ्या गठ्ठ्यातले चांगले कपडे काढले.

 पुण्याला एकदा आम्ही गेलो. तिथं आम्हांला प्रोग्रॅमला जायचं होतं. पन्नालाल सुराणा वगैरे येणार होते. तर मी जाताना माझ्या तीन-चार साड्या काढल्या आणि त्यांना विचारलं, “अहो, मी तुमच्या बरोबर येणाराय. कुठली साडी घालू?" ते भडकले माझ्यावर. म्हणाले, "हे काय, इतका सिली प्रश्न मला विचारते. तुझ्या मनात असेल ते घाल की. मी काय तुला सांगितलंय हे घाल, ते घालू नको म्हणून?" मला खूप वाईट वाटलं. कौतुकानं विचारलं तर हे असं बोलले. म्हणाले, “अग, मला काय विचारतेस? मी तुला विचारतो का कधी? आणि तू पण मला सांगत जाऊ नको का अमूक घाला नि तमूक घाला म्हणून. तुझं स्वातंत्र्य तुला राहू दे. माझं स्वातंत्र्य मला राहू दे. वाटेल ते तू कर. कोणतंही घातलं तरी मी ऑब्जेक्शन घेणाराय का?" मी म्हणायची, "अहो, तुम्ही झब्बा आणि पायजमा घातला ना, तुम्हांला खूप छान दिसतो." तर वाद घालायचे, "नको मी हेच घालतो, शर्टपॅट." "शर्टपँट नाही चांगली दिसत हो, तो खोचता ना शर्ट, तुम्हांला खोचता पण नाही येत.” मी म्हणायची. नि मग महंमद दलवाई वगैरे सांगायचे नं त्यांना, झब्बा घाल रे, तुला छान दिसतो. मग काय करायचे? घालायचे नि मला म्हणायचे, “मेहरू, महंमददा मला आज म्हणाला झब्बा घाल." “अहो, महंमददा नाही म्हणाले, मीच म्हणाले. मी जेव्हा म्हणते तेव्हा महंमददांचं नाव कशाला घेता? त्यांनी म्हटलं ते पटलं काय तुम्हांला? नि मी सांगत होते तेव्हा पटलं नाही. जो माणूस बारीक असतो त्याने ढगळ सैल कपडे घातले म्हणजे तो चांगला दिसतो. तरी अशा इच्छेने तुम्हाला सांगते, तर नाही. म्हटलं दाढी करा, तर नाही. महंमददांनी सांगितलं म्हणून मी दाढी केली, असं कशाला तुम्ही बोलायला पाहिजे?" असाही आमचा वाद व्हायचा.

७४ : मी भरून पावले आहे