Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्यासाठी करतोय. त्यामुळे तिला खूप भरून यायचं. मी साडी दिल्यानंतर ती ठेवायची. पण ती काय करायची हुशारी मग, मी यांच्याबरोबर कधी फिरायला निघाले की म्हणायची, "भाभी, त्या दिवशी दादानं ती साडी आणलेली ती घडी मोडा नं. ती घडी तुम्ही दादांच्या बरोबर जाताना मोडा, मग मी नेसेन." आणि असं करून ती मला घडी मोडायला साडी देत असे. ती मी घालून यांच्याबरोबर मिरवून यायची. नि मग ती पेटीमध्ये घालून ठेवायची. कधी दोघं बरोबर जायचो. कधी पिक्चरला, कधी नातेवाईकांकडे, जोगेश्वरीला. विजय तेंडुलकरांकडे आम्ही सारखे जात असू. त्यांच्या काही मित्रांकडे जात असू. असं काही ठरलेलं नसायचं की अमूक ठिकाणी जायचं. रविवार आहे, दिवस कुठं घालवायचा? संध्याकाळी एक फेरी मारून यायची. कंटाळा आला म्हणून जात असू गप्पा मारायला.
 बरं, आपण अंगावर कधी नवीन साडी घातली तर ते कधी विचारायचे नाहीत, की ही कुठून आणली? केवढ्याला आणली? कशाला आणली? असं कधीच विचारायचे नाहीत ते. पूर्ण स्वातंत्र्य होतं, पण त्याच्यावर असं वाटायचंही नाही का आपल्याकडे पैसे नाहीत, हिनं कुठून आणलीय अशी शंका बाळगली असंही नाही. एखाद्या वेळी खादीची साडी आहे, आवडली तर कौतुकानं विचारायचे की, मेहरू ही साडी कुठून घेतली? की समजायचं की यांना खूप आवडलीए. “छान आहे हं." एवढंच म्हणायचे. गप्प बसायचे.

 एकदा काय झालं, ते म्हणाले, 'कपाटातले माझे सगळे कपडे काढ बुवा. सगळे मिक्सअप झाले. मला कळत नाही का बाहेर जाताना कुठले घालायचे." मग सगळे कपडे आम्ही काढले. ते म्हणाले की, “सगळे असे वेगळे वेगळे बांधायचे, म्हणजे मी प्रोग्रॅमला जाताना कुठले कपडे घालायचे? मी मुंबईत असताना कुठले, दौऱ्यावर असताना कुठले कपडे घालावेत?" असं करून पोटल्या आम्ही बांधल्या. मुंबईचा जो गठ्ठा होता. त्यात फाटलेले कपडे होते. इकडे कॉलरला फाटलेला, हाताला, पायाला फाटलेला. इथल्या इथं जायला चालतंय म्हणून बांधून ठेवला. पण नंतर गंमत काय व्हायला लागली. आम्ही बरोबर कुठे गेलो तर मी चांगल्यातली चांगली साडी काढायची. चांगली नटून थटून जायची. सगळ्याच बायका करतात तसं नवऱ्याबरोबर जायचं म्हणजे. आपण पण उठून दिसलं पाहिजे असं मला वाटायचं. पण ते काय करायचे, नेमका तो फाटलेला गठ्ठा असायचा त्यातले कपडे घालायचे. कारण मुंबईतल्या मुंबईमध्ये जायचं. इथल्या इथं जायचंय. मेहरूबरोबर. असं कधी डोक्यात नाही आलं, ही चांगलं घालते.

मी भरून पावले आहे : ७३