पान:मी भरून पावले आहे.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण माझ्या वाट्याला जेवढं येतं तेवढं मी करतो. नाहीतर तिलाच सगळं करावं लागतं. त्यामुळे मी थोडसं काम करतो."

 रविवार असला तर दुपारी सगळेच घरात असतात. साधी गोष्ट असते की आपण दुपारी घरात जेवायला थांबलं पाहिजे. सुरुवातीला ह्यांच्या लक्षातच यायचं नाही. हे बाहेर गेले आणि कुणी म्हटलं की हमीदभाई दुपार झालीय. इथंच जेवून जा. तर हमीदभाई जेवून यायचे. आम्ही आपले स्वयंपाक करून वाट बघत बसायचो. हे आले की म्हणायचे, “मेहरू, तू जेवून घे. मी अमूककडे जेवून आलोय." दोनदा असं झाल्यानंतर मला राग आला आणि मी म्हटलं. "तुम्हांला हेही समजून सांगितलं पाहिजे का? साधी गोष्ट आहे. सुट्टीचा दिवस असतो. तर आपल्या फॅमिलीबरोबर आपण जेवावं. काहीच नसतं का तुम्हांला?" "काय झालं त्यांनी आग्रह केला तर? समजा ती माणसं आपल्याकडे आली असती, आपण आग्रह केला असता, तर तो माणूस आपल्याकडे जेवला असता? तो म्हणाला असता, "बाबारे, माझ्या बायकोला आज सुट्टी आहे. मी जेवायला घरी जातो." "तुम्हांला नाही नं बोलता आलं?" तर “नाही, मला एवढं सुचलं नाही." याच्यापुढे दुपारी, सुट्टी असल्यानंतर तुम्ही कुठे जेवायचं नाही. आपल्याचकडे यायचं आणि असं काही ठरलं असेल तर आपण बरोबर जायचं. नाही तर जायचं नाही हे मला सांगावं लागलं. मुद्दाम करायचे नाहीत, पण सांगितल्यावर म्हणाले, "तू असं म्हणतेस नं. माझी चूक झाली. मला नाही कळलं." असं मान्य करायचे ते. तो वाद तिथंच मिटायचा. त्यानंतर कुठंही बाहेर दौऱ्यावर गेले, कामासाठी गेले बाहेरगावी, तर येताना साडी आणायचे आणि दाखवायचे. म्हणायचे, "मेहरू, हे बघ मी साडी आणलीय. खूप चांगली आहे. ओळख बघू ती कोणासाठी आणलीय?" तर मला माहिती असायचं. माझ्या धाकट्या नणंदेवर त्यांचं खूप प्रेम होतं. तिचं नाव फातमा होतं. फाफा, फा-फा करायचे. तर बघ ही मी फा-फा साठी आणली. तिला कोण आणणार ग? तिचं कोणंय आपल्याशिवाय? आपणच आणायला पाहिजे. ती लहान आहे. तर तू असं कर, ही साडी घे, तिला तूच सांग की तुझ्यातर्फे तिला साडी दिली म्हणून. एवढं करून ते साडी माझ्या हातात द्यायचे. त्या वेळी माझ्या डोक्यात असं यायचं की मला का नाही आणत हे साडी? पण ते म्हणायचे, "तू घेऊ शकते ना, तू कमावतेस. तुला काही बंदी नाहीये. त्यामुळे तू कधीही घेऊ शकते. तिला कोण आणून देणार? त्यामुळे आपण तिला दिलं पाहिजे." हे माझ्या नणंदेच्याही लक्षात यायचं की भाभीला न आणताना दादा

७२ : मी भरून पावले आहे