पान:मी भरून पावले आहे.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एवढी टॅक्सी करून, एवढे पैसे खर्च करून जाण्यासारखं काय होतं?" तर मी म्हटलं, “जाऊ दे हो. म्हातारा मनुष्य आहे आणि त्यांचं मन आपण राखलं पाहिजे. आपले विचार आपल्याबरोबर. त्यांना कशाला आपण दुखवा? जाऊ दे. त्यांचं समाधान व्हावं म्हणून मी गप्प बसले. त्यांना बरं वाटलं की नाही?" आणि ह्याच्यानंतर बाबांनी गावाला गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं, "माझ्या हमीदखानचे विचार काहीही असू दे, पण मेहरूने मला दर्ग्यावर नेऊन आणलं की नाही?" त्यांना समाधान वाटलं.
 आम्हांला दोनच मुली असल्यामुळे आम्ही गावात गेलो की बायकांमध्ये चर्चा व्हायची, 'आमच्या हमीदखानला एखादा मुलगा हवा. त्याचं नाव कोण चालवणार?' हे मला डोळा मारायचे आणि सांगायचे 'मेहरू, आपण विचार करू या.' सुरुवातीला मला हे ऐकल्यावर राग येत असे. पण हे माझी समजूत घालायचे की ‘ह्या बायका अडाणी आहेत. ह्यांच्या बोलण्याचं तू वाईट वाटून घेऊ नको, आपल्याला जे हवे तेच आपण करू या.'
 या बायकांमध्ये माझी सासू मरियम पण होती. एक दोनदा ऐकलं आणि मग मी मरियमला सांगितलं. 'तुला पाच मुलं आहेत, जर मला मुलगा पाहिजे म्हणून मला आणखी काही मुलं झाली तर मी माझ्या पगारात तुझी आणि माझी मुलं कशी सांभाळणार? मला कमी मुलं असली तर तुझाच फायदा आहे. मी तुझ्या मुलांना आपलं मानेन. परत तू ह्या विषयावर बोलू नकोस.' तिच्या हे लक्षात आलं आणि तिने तो विषय परत कधी काढला नाही.

 त्याच्यानंतर आणखीन एक आठवण. रविवारचा सुट्टीचा दिवस असायचा. तेव्हा बाजार आणायचं ह्यांचं काम असायचं. म्हणजे कोंबडी किंवा मटण. ते सुद्धा सावकाश दहापर्यंत निघायचं आणि बारापर्यंत परत यायचं. सगळी लोकं रस्त्यामध्ये भेटणार, बोलणार. प्रत्येकाला सांगणार, ए, कोंबडी आणलीय; चल जेवायला. सुट्टीचा दिवस असल्यानं कोणी यायचं नाही. सगळ्यांना माहीत होता यांचा स्वभाव. घरी काही लोक यांची वाट बघत बसलेले असायचे. ते विचारायचे, साहेब कुठे गेले. मी सांगायची मटण आणायला मार्केटमध्ये गेले. “काय बाई, साहेबांना मटण आणायला पाठवता? भाजी आणायला पाठवता? पिशवी घेऊन पाठवता? काही बरोबर नाही." आणि इतक्यात हे आल्यानंतर काय म्हणायचे, "कायें करायचं बाबा? खायला लागतं म्हणजे काम करायला पाहिजे." असं आणि डोळा मारायचे मला. आणि मग मी आत गेल्यानंतर सांगायचे, "काय करायचं? माझं काम तेवढंच असतं. मी काही जास्त काम करत नाही.

मी भरून पावले आहे : ७१