या मुली समोर बसल्या ना तुमच्या. त्यांना न देता तुम्ही खाताय. “अरे, मेहरू मी बघितलं नाही त्यांना. सॉरी, सॉरी. अरे काय बाब्या, समोर ठेवलं म्हणजे खायचं. बाबांनी देण्याची काही जरुरी आहे का? समोर ठेवलं म्हणजे सगळ्यांनी खायचं असतं. थांबता कशाला? घे. घे." अमूक घे असं म्हणून त्यांना घाईघाईने द्यायचे आणि मग त्यांच्या लक्षात यायचं की एकटे आपणच खातोय. आणखीन एक म्हणजे त्यांना कुठलीही गोष्ट पाहिजे, चहा साधा पाहिजे तर ऑर्डर सोडण्याची त्यांना सवय नव्हती. माझंच काम आहे चहा करण्याचं, मीच केला पाहिजे, त्यांना आल्याबरोबर विचारलं पाहिजे, त्यांना दिला पाहिजे असं काही नव्हतं. त्यांना चहा जरी मागायचा असेल तरी म्हणायचे, “मेहरू, तू चहा घेणार आहेस का? घेतला नाहीस ना? घ्यायचाय का तुला? तुझ्यासाठी तू करत असशील तर अर्धा कप मला कर. मीही घेतलेला आहे. पण मला हवाय ग थोडा. तू केलास तर मला दे. तुला नको असेल तर नको", असं. मडक्याच्या समोर उभे रहायचे आणि म्हणायचे, "मेहरू, जरा पाणी दे." पाणी दे म्हटल्यावर, “अहो तिथं मडकं आहे. मडक्यासमोर उभे आहात. पाणी आहे. ग्लास आहे. पाणी काढायचं आणि प्यायचं. पाणी काय मागता तुम्ही?" तर डोळा मारून परत म्हणायचे, "नाही ग. तू दिल्यानंतर गोडी वेगळी वाटते. गोडी वाढते ग. त्यामुळे तूच दे ना पाणी." आणि खूष करण्यासाठी मग दिलेलं सगळं पाणी प्यायचे.
एखादे वेळी मी जेवत बसले ना की म्हणायचे “तुला पाणी पाहिजे? बघ मेहरू, मी तुला पाणी दिलं का नाही. तू मागितलंसुद्धा नाहीस. पण मी दिलं तुला. मी मागितलं की तू बोलतेस, पण मी बोललो का तुला असं? हे घे." आणि असं करून पाणी द्यायचे.
माझ्यावर त्यांनी कधी संशय घेतला नाही. समजा ऑफिसातनं यायला वेळ झाला असेल, कितीही वेळ झाला असेल, मी न सांगता कुठे गेली असेन तरी आल्याबरोबर असे तापायचे नाहीत. कुणाबरोबर गेली होतीस, कुठे गेली होतीस असलं ते काही विचारायचे नाहीत. म्हणायचे, "दमलीस. खूप काम होतं वाटतं. बस, बस जरा. पाणी-बिणी पी, आराम कर. खूप काम पडलं ना. त्रास झाला ना आज तुला. आराम कर. जरा उशीरा जेवू. आपल्याला काही हरकत नाही." असं म्हणायचे. माझा पगार किती आहे हे त्यांना माहीत नव्हतं. कधी कधी गंमत म्हणून म्हणायचे, “अग, नवऱ्याला तरी सांग ना तुला पगार किती आहे हे. काय नवरा घेणार आहे का?" तरीही मी सांगितलेलं नाही.