Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काम करते, काही नाही. हा संसार तुझा आहे. तू कुठूनही पैसा आण. आणि त्यांना गरज लागली तरी मी पैसे नेऊन दिल्यावरसुद्धा त्यांनी कधी विचारलं नाही की, हे पैसे कुणाकडनं आणले. माझ्याकडे काही दागिने होते, ते मी माझ्या आईकडून आणले होते. एक सोनार जवळ बघितलेला होता. मी नेहमी ते त्याच्याकडे गहाण ठेवायची आणि पैसे आणायची. हे त्यांना माहीतही नसायचं. पण त्यांनी कधी मला संशयाने विचारलं नाही की हे पैसे तू कुठून आणलेस! उलट मी त्यांना म्हणायची, "बाहेरचं कर्ज करायचं नाही हं. लोकांचं कर्ज मी फेडणार नाही. जे काही लागेल ते माझ्याकडून घ्यायचं आणि मला परत फेडायचं." आता माझ्याकडून घेत असत ते कधी फेडलं नाही, ही बाब वेगळी. मी मागितलं पण नाही.

 जेवणाचं ताट त्यांना वाढल्यानंतर पहिला प्रश्न ते विचारायचे, 'हे मला जे दिलंय ते सगळ्यांनी खालंय का? बाब्या, तू खाल्लं का? फाफा, तू खाल्लं का? मेहरू, तू हे खाल्लेलं आहे ना? मला एकट्याला नको.' जे काही असेल ते सगळ्यांना द्यायचं. कधी कधी काही नसलं तरी त्यांनी काही विचारलेलं नाही की आज असं जेवण का? उलट असं असे की मटणाचं कालवण केलं आणि ते चांगलं झालं नाही तर म्हणायचे, 'तुम्हांला येत नसेल ना, तर करायचं नाही. हे जे सगळं नाश करता ना त्यापेक्षा डाळ शिजवा. मी खाईन. पण असं करायचं आणि वेस्ट करायचं नाही. हे चांगलं का नाही झालं तुमचं? कारण तुम्ही लक्ष देऊन नाही केलं.' म्हणून ते बहिणीला बोलायचे.

 जेव्हा मंडळावरती काम करायला लागले तेव्हा मंडळाची गाडी होती बऱ्याच वर्षांपूर्वी. तर गाडी आमच्या दारात उभी राहायची. रोज काही पेट्रोल परवडायचं नाही. कुठे नेण्याचा प्रश्न यायचा नाही. कधीतरी आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी हे चर्चगेटला जाणार आहेत, त्यांचं काही काम आहे, तेव्हा ती गाडी काढायची. पण रोज चालू करून ठेवायला तर पाहिजे. आता चालू करायची म्हणजे कुठे फिरवायची? माझं ऑफिस एक मैलावर होतं. त्यामुळे ते काय करायचे. मला रोज सोडायचे स्वतः चालवत. ते शिकले होते. शिकले पण कसे माहितेय का? ते म्हणाले, गाडी शिकायची असेल तर क्लासमध्ये, मोटार क्लासमध्ये वगैरे नाही शिकायची. टॅक्सीवाल्याच्या बाजूला बसायचं आणि प्रवास करायचा. टॅक्सीवाल्याला सगळं विचारायचं की असं सिग्नल आलं तर काय करायचं? ते सगळं बरोबर सांगतात. ते शिकलेले असतात.

मी भरून पावले आहे : ६१