पान:मी भरून पावले आहे.pdf/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे जेवून जायचे. पण रात्रीचं मला वाटायचं की आपण बरोबर बसावं, बोलावं, खावं. मी थांबायची आणि यांना यायला वेळ व्हायचा. वेळ होतो म्हणून मी चिडायची पण नाही त्यांच्यावर. पण गंमत काय व्हायची? वेळाने आले आणि आपण त्यांना ताट वाढून दिलं की, 'तू जेवली नाहीस?' असं विचारायचे, पण माझं ताट वाढेपर्यंत त्यांचं जेवण संपायचं आणि मी पुन्हा एकटीच जेवत बसायची. हे त्यांच्या कधी लक्षात आलं नाही. दुसरं असं की ते मला म्हणायचे की तू माझ्यासाठी जेवायची थांबतेस कशाला? तुला वेळ होतो. तुझी भूक मरून जात असेल. एक तर तू दुपारी जेवत नसशील ऑफिसात. डब्यामध्ये काय जेवण जातं असं? त्यामुळे तू माझी वाटच बघत जाऊ नको. पण असं वाटायचं की आपण त्यांच्याबरोबर जेवावं. एक बायकांना वाटत असतं म्हणून. मग ते काय करायला लागले. चर्चगेटला समजा कुठे कामाला आले, ९ वाजले असले की फोन करायचे आणि सांगायचे की मेहरू, माझं आता सगळं काम झालेलंय. मी निघतोच. तू जेवून घे. “अहो, सगळं झालेलंय ना, मग एका तासात तुम्ही येता. मी थांबते." की पुन्हा तेवढाच वेळ व्हायचा. आणि ते यायचे नाहीत. नंतर नंतर म्हणायचे की तुझ्यामुळे मी काम करू शकत नाही. मला तुझं टेंशन येतं की ९ वाजून गेले. मेहरू माझ्यासाठी थांबली असेल. ती जेवली नसेल आणि अशा रीतीने आपण बाहेर राहावं का? मी काम करू का नको करू? त्यामुळे तू मला असं मोकळं सोड. तू तुझ्या मनात येईल तेव्हा जेव. मनात येईल तेव्हा झोप. तुझा प्रोग्रॅम आखून घे आणि कर. माझ्यासाठी तू असं केलंस तरी मला टेंशन येतं. असं बोलले तरी मी कधीही ते आल्याशिवाय जेवले नाही. नव्हतं मला जेवण जात. मी काय करणार? मला त्या वेळी असं वाटायचंच नाही की जेवावं म्हणून. त्यांच्याबरोबरच जेवायची. ते कितीही उशीरा आले तरी बसायचे, दिवसाचा रिपोर्ट द्यायचे. आज मी असं केलं. हे काम केलं. ते काम केलं. सगळं मोकळेपणाने सांगायचे. त्याच्यात आडपडदा नसायचा. मग जेवतानाची गंमत अशी की कधी लवकर आले, जेवायला बसले, जेवून-बिवून घेतलं आणि नंतर आपण काहीतरी फळं वगैरे खायला समोर दिलं तर लगेच जेवल्या-जेवल्या हातात पुस्तक घ्यायचं. पुस्तक कधी सुटायचं नाही. समोर असायचं. समजा द्राक्ष-बिक्षं दिलं तर पटापट खायचे. मुलं समोर बसलेली आहेत याचं त्यांना भानच रहायचं नाही. मुली समोर बसलेल्या असल्या तरी हात नाही लावायच्या. आणि थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की मी बाहेर यायची आणि म्हणायची की काय हे, तुम्ही वाचत बसला?

मी भरून पावले आहे : ५९