पान:मी भरून पावले आहे.pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते सांभाळ करत होते. शिवाय एवढ्या मोठ्या माणसाला आपण दुखवा कशाला? त्या काळात हे सगळं चालत होतं. त्यामुळे हे बोलायचे पण नाहीत. बाबा यांना खूप मान द्यायचे.

 आजारीपणात दलवाई सारखं सांगायचे की मला माझ्या आईवर खूप लिहायचंय. हे सगळं त्यांना लिहायचं होतं. पण त्या वेळी मला लिहिता येत नसे. त्यामुळे त्यांनी सांगितलं तरी कोण लिहून घेणार? त्यांच्या चौथ्या आईच्या मुली एस.एस.सी. झालेल्या. पण तिसऱ्या आईच्या मुली तीन होत्या. त्या शिकलेल्या नव्हत्या. ४ थी - ५ वी अशाच शिकलेल्या. पण जेव्हा त्यांची लग्नं जमली तेव्हा नवऱ्या मुलाला समोर उभे करून मुलीला म्हणजे आपल्या बहिणीला ह्यांनी विचारलं की ह्याच्याशी तुझं लग्न करून दिलं तर तुला आवडेल ना? असं विचारूनच लग्न केलेलं आहे. आणि लग्न झाल्यावर सुद्धा आता 'तुम्ही जा, तुमचा संसार करा' असं नाही केलं. त्या दर आजारीपणाला आमच्या घरी यायच्या. त्यांना डॉक्टरला दाखवायचं, औषधपाणी द्यायचं, सर्व त्यांचं करायचं. सगळ्या फॅमिलीसकट आणायचं, घरी नेऊन सोडायचं. एवढंच नाही, आम्ही दर वर्षी जात होतो गावाला. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा म्हणायचे, 'घरात जा मेहरू. सामान किती आहे घरात बघा, भरून ठेवा सामान.' कारण दोघी बहिणी लग्न झालेल्या त्यांच्या फॅमिलीसकट आमच्या घरी माहेरपणाला यायच्या. हे आहेत म्हणून सामान भरायचे. तीस-चाळीस माणसं रोजची खायची, बाजारहाट आणायचा आणि दोन दिवस आम्ही राह्यलो तर दोन दिवस सगळ्यांना भरपूर खाऊ-पिऊ घालायचो. ह्यांनी मोठ्या मुलाचं कर्तव्य नेहमी पार पाडलं. कधी फूसफूस अशी केलीच नाही. या बहिणी आमच्या मुंबईच्या घरी यायच्या, त्या महिनाभर राहायच्या. आजारी असल्या तर डॉक्टर-बिक्टरला दाखवायचो. पण त्या काळामध्ये हे काय म्हणायचे, बघा, तुम्ही आलात. आता तुमच्या भाभीला आराम द्या, ती नेहमीच काम करते. त्यामुळे तिनं आता घरातलं काहीच करायचं नाही. मला म्हणायचे, "मेहरू, तू नुसतं सामान आण, बाजार आण, घरात टाक आणि मी सांगतो ते त्या करतील." असं आमचं जेवण व्हायचं आणि माझ्यासाठी ठेवलं जायचं. मी आल्याबरोबर मला सांगायचे, आयेशानं आज असं असं केलं. भाभी, मी आज असं असं केलं हं, आणि ते मग केलेलं कौतुकानं मला खायला घालायचे. त्यामुळे माझे पैसे गेले आणि खर्च झाला असं मला वाटायचं नाही. जाऊ देत. सगळे खातात माझ्या घरी आल्यानंतर.

मी भरून पावले आहे : ४७