नंतर मी प्रयत्न पण केला की तिने सातवीची परीक्षा द्यावी. तिला परीक्षेला बसवावं, शिकवावं असं मला वाटायचं. पण तिचं लक्ष अजिबात नसे. तिचं शिक्षण काही झालं नाही. ती घरात रमली आणि ती घरातला भार खूप उचलायची, जबाबदारीने उचलायची. ती मला आईच म्हणायची, तिला सख्खी आई नव्हती, म्हणून मलाच ती आई म्हणायची. सगळे म्हणायचे की माझ्या मुलांच्यापेक्षा मी तिच्यावर जास्त माया केली.
मला कैक वर्ष माहिती नव्हतं की हे सावत्र आहेत. कोणी सख्खं नव्हतं त्यांना. त्यांची ती हिस्ट्री विलक्षण. बाबांची जी पहिली बायको होती तिला मूल नव्हतं. आणि त्यांचा धंदा -बिंदा खूप चांगला चालायचा. आता मूल नाहीये तर त्या काळामध्ये एखादं तरी मूल पाहिजे म्हणून त्यांनी पंधरा वर्षांनी ह्यांच्या आईला करून आणली. हे सांगताना दलवाई म्हणाले, “बाबा पंचेचाळीस वर्षांचे होते आणि आई सतरा वर्षांची होती. दुसरं असं की गावातील ही सगळ्यांत देखणी मुलगी. मामा-बिमा असे देखणे. घारे-घारे डोळे. देखण्या बायका. मेहरू, मी लहान असतानाच माझी आई वारली. पण माझ्या आईला काही ते सगळं बरोबर वाटायचं नाही. एवढा म्हातारा नवरा. कधी बाबा आमच्या आईच्या खोलीत आले ना की आमच्या आईच्या कपाळावर आठ्या पडत.” १७ व्या वर्षी लग्न झालं नंतर तिला झाला टी.बी. यांना दुसरा भाऊ झाला. तो भाऊही वारला. मग आईही २४ व्या वर्षी वारली. आता या दोन बायका झाल्या. परत हे लहान. यांना सांभाळणार . कोण? म्हणून तिसरी बायको केली बाबांनी. तिला तीन मुली आणि एक मुलगा, . आणि मुलं लहान असताना ती बायको मेली. चौथी करायची गरज नव्हती. सगळ्यांनी सांगितलं काही गरज नाहीए. ह्यांची एक चुलती विधवा होती, सहाच महिने झाले होते लग्न होऊन. गरोदर राहिली आणि भाऊ वारला. ती विधवा झाली. त्या मुलालापण बाबांनी सांभाळलं. त्या भावजयीला पण सांभाळलं. सगळे म्हणत होते ही तुम्हांला रोटी करून घालेल. तुम्ही लग्न नका करू. पण नंतर काही लोकांनी पैशाच्या लालचमध्ये येऊन घाटावरची बिचारी अशिक्षित बाई लग्न करून आणली. तिला काय माहिती? आता जी माझी सासू आहे ती माझ्या वयाची असेल, किंवा वर्षा-दोनच वर्षांनी मोठी असेल. तिचं लग्न करून आणलं. मग तिला झाली ५ मुलं. अशा रीतीनं हा सगळा पसारा वाढला. ही जर बायको केली नसती तर सहा माणसं कमी झाली असती. ते झालं नाही. मग हे म्हणायचे, की ही एकाच बापाची सगळी मुलं आहेत. आणि या मुलांनी तर काही पाप केलेलं नाही. माझ्या बापाने जर चूक केली असेल तर मला बोलायचा अधिकार पण नाही.