सकाळच्या नाष्ट्याला समजा एक अंडं फोडून मी त्यांना दिलं किंवा अंड्या-बटाट्याचं कालवण करताना एक अंडं सगळ्यांच्या प्लेटमध्ये घातलं तर ती माझी नणंद अजून बोलते की भाभीकडे मजा असायची, एक एक अंडं आम्हांला मिळायचं. इथं आम्ही एक अंडं चार माणसं खाताना बघतो. पण भाभी मात्र आम्हांला एक एक अंडं खायला द्यायची. म्हणजे अशी सुद्धा त्यांची प्रेमाची तऱ्हा होती. बाबांनी आणि यांनी ते मानायला लावलं की घरात ही मोठी आहे. घरातली धुसफूस कधी त्यांच्या कानावर गेली नाही. आणि कधी गेली तर ते म्हणायचे, "हे बघा, तुमच्या भाभीला विचारा. मला सांगू नका. तिचं घर आहे. माझ्यापर्यंत कुणी काही आणायचं नाही." मायलेकीसारखं हे वागणं व्हायचं. मला उलट कोणी बोलायचं नाही. माझी आज्ञा कोणी पाळलेली नाही असं झालेलं नाही. ही कर्तीधर्ती आहे. मोठी आहे, समजूतदार आहे, ही बोलेल ते खरं आणि तिच्याप्रमाणे सगळं व्हायला हवं. आणि माझं काही चुकलं तर हे मला म्हणायचे, “नाही हं मेहरू, तुझं चुकलेलं आहे हे." पण शांतपणे. आदळआपट-आरडाओरड नाही.
आमच्या घरात जरी कोणी आलं,चार माणसं, तरी उठले, आले आणि जेवायला बसवलं असं होत नसे. समजा काही माणसं आली तरी “अरे, तो गेला का, त्याला जेवायला बसवा." असं मी म्हणायची. तेव्हा, “ते डिपार्टमेंट तुझं", असं ते म्हणायचे. “तू बाहेर येऊन का नाही सांगितलं त्याला?" म्हणजे त्यांना बोलायची गरज नसे, विचारायची गरज नसे की माणसाला जेवायला बसवू का? मी सांगायचं की, 'अहो जरा त्यांना थांबवा, ते जेवून जातील.' 'ही बघा मेहरू म्हणते तुम्ही जेवून जा", असं म्हणायचे ते. प्रत्येक माणूस आला की आतून मला बोलवायचे, त्यांची भेट करून द्यायचे, लेखक मंडळी वगैरे कोण येतील त्यांची सर्वांची. त्यांच्या कामाच्या संदर्भात बरीच माणसं येत असत. कामाच्या म्हणजे समाजकार्याच्या. म्हणजे त्यांच्या डोक्यात जे होतं ना, त्या संदर्भात काही लोक येत. आणि त्यांचे विचार ऐकण्याची मला संधी मिळाली. ते त्यांची कथा ऐकायचे. कुणाला मदत करायची, काय काय करायचे. मग ते म्हणायचे, 'आत जा, बाईंशी जरा बोला.' मग ती मंडळी आत येऊन घरच्या डिफिकल्टी सांगायची. माझ्या बायकोचं असं झालं, मुलीचं तसं झालं, मुलीला सोडलं. ऐसा ऐसा हुआ. आणि मी ते सगळं ऐकायची. ऐकल्यानंतर त्यांना मग मी सल्ला द्यायची. “नाही असं नाही. तुमच्या मुलीचं असं करायचं.” मग कोणत्या अडचणी असायच्या. हे रुपये घ्या आणि जा म्हणून सांगायचं. मग ते घेतल्यावर हे चौकशी करायचे, तो माणूस आला होता तो काय म्हणत होता?