पान:मी भरून पावले आहे.pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना बोलावलं. ते आल्यावर जमावातील काही लोकांना घरात या, आपण बोलू या, असं सांगून हात धरून त्यांनी आत आणलं. काय झालं विचारलं. ते म्हणाले कोणी तरी गाय मारून फेकली आहे. आमच्याबरोबर चला. सगळे ऐकून घ्या आणि मगच पेपरात बातमी द्या. काही तर विचारत होते, तुमची जात कोणती? मी म्हणाले, जातीशी तुम्हांला काय करायचं आहे? कामापुरतं बोला. ते म्हणाले, आमच्याबरोबर ह्यांना नेतो आणि सकाळी परत आणून सोडतो. हे ऐकून फार भीती वाटली. हा माणूस परत येईल ना? हे त्यांना जिवंत ठेवतील ना? असे विचार आले पण दुसरा काही पर्याय नव्हता. काही लोकांनी हमी घेतली आणि ह्यांना त्या लोकांच्या स्वाधीन केलं. रात्रभर आम्ही सगळे बसून होतो. त्यांचं काय झाले असेल ह्या भीतीने. पण सकाळी हे परत आले, तिथे काय झालं हे त्यांनी मला सांगितलं नाही. पण हे प्रकरण मिटलं असावं असं समजून मी गप्प राहिले. तिथे काय घडलं त्यापेक्षा हे सुखरूप परत आले, यावर मी समाधान मानून घेतलं.

 ते घर पण गेलं. मग काय करायचं? मग आम्ही घर नाही नाही म्हणताना जोगेश्वरीला आलो. तर यांच्या नातेवाईकांनी एक खोली बघितली होती. त्याच्यात एक पलंग. पलंगावर आम्ही तीन माणसं. म्हणजे रुबीना माझी तेव्हाच झाली होती. बासष्टला रुबीना झाली. ते बाळंतपण पुण्याला आजीने केलं. आजीने तिच्याकडं पैसा नसताना पहिलं बाळंतपण म्हणून बोलावलं. त्याच्यानंतर माझ्या धाकट्या नणंदेचं लग्न जमलं आणि बाबांनी बोलावलं. महिन्या सव्वा महिन्याची मी बाळंतीण, मला गाडी करून तिथं गावाला नेली आणि तिथं तिचं लग्न उरकलं. त्याच्यानंतर आम्ही आलो जोगेश्वरीच्या खोलीमध्ये. त्या खोलीमध्ये साडेतीन वर्षे आम्ही काढली. वारा यायला जागा नाही. वर एक खुली खिडकी होती. तिच्यातनं असं पाणी पडायचं, किडे पडायचे. पावसाच्या दिवसात असं बसून राहायचं एका जागेवर. बाहेर गॅलरी होती पण ती सगळी ओपन होती. माझा दीर पण त्या वेळी माझ्याकडे शिकायला आला होता. नणंद होती. पण दीर बाहेर झोपायला जायला मागायचा नाही. म्हणजे त्याच्याकडं फारशी समजूत होती असं नाही. तर तो गॅलरीत झोपायला तयार नसायचा. ही मुलगी होती तिला बाहेर झोपवायचं कसं म्हणून आम्ही तिला पण आत घेत होतो. अशी आम्ही तिकडे साडेतीन वर्ष काढली. हाच माझा दीर हुसेन. माझं लग्न झालं तेव्हा तो चौथीत होता. बी.ए.पर्यंत तो शिकला. तो दलवाईंचा फार लाडका होता. आपल्याला परिस्थितीमुळे शिकायला मिळालं नाही.

४० : मी भरून पावले आहे