पान:मी भरून पावले आहे.pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझा हात धरला आणि म्हणाले, चल, आपण घरी जाऊ या. मला घरी आल्यावर हे सगळं सांगितलं, हे बघ असं असं झालं. त्यांना असं वाटत असेल की मला त्रास दिला की मी तुझ्याशी वाईट वागेन, तुला सोडून देईन, तुझं नुकसान करीन. पण तसं करणारा मी माणूस नाहीये. मी स्वतःहून तुझ्याशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे तूही लक्ष देऊ नको, ती शेवटी माझी सासू आहे, तो माझा मेव्हणा आहे. मी माझं बघून घेईन, तू मधे पडायचं काही कारण नाही.
 पुन्हा प्रश्न पडला ना कुठे राहायचं? मग आर्मीचे क्वार्टर्स होते कुलाब्याकडे तिथं त्यांचा मित्र होता. त्याची जागा मिळाली पण त्या बाईचा भाऊ वेडा होता का काय माहिती नाही, तो सुरीचाकू घेऊन एक दिवस मारायला आला. केवढा प्रसंग ओढवला? तिथे माझी नणंद, मी आणि हे राहात होतो. काय त्याचं डोकं फिरलं माहिती नाही. दारं-खिडक्या आम्ही बंद केलेल्या आणि तो आम्हांला भीती दाखवत होता. आम्ही जीव घेऊन रात्रीच्या रात्री कसे तरी तिथून पळालो. सामान सगळं सोडून आम्ही पळालो आणि परत मी अंधेरीला महंमददांकडे आले.

 आणि मग ते सामान आम्ही मिळवून घेतलं व त्याच्यानंतर आम्ही राह्यलो बांद्याला हाऊसिंग बोर्डाच्या घरामध्ये एक वर्ष करार करून. इल्लीगल होतं सगळं. पण तिथे एक वर्ष राहिलो. या काळात एक घटना घडली. आम्ही बांद्याच्या गांधीनगर हाऊसिंग बोर्डमध्ये १० महिने राहिलो. तेव्हा ही घटना घडली. नेहमीप्रमाणे दलवाई सकाळी उठले आणि पान खाऊन येतो म्हणून गेले. स्टेशनवर पानाचं दुकान होतं. तिथे उभे असताना त्यांच्या मागे काही माणसं जमा झाली. पानवाल्यानं हळूच त्यांना सांगितलं. तो म्हणाला, आज कोणी तरी गाय कापून टाकली आहे. म्हणून हे लोक तुमच्यामागे आहेत. सांभाळून घरी जा. हे ऐकून त्यांना काही भीतीबीती वाटली नाही. फारच माणूस धीराचा. घरापर्यंत जमावाने त्यांचा पाठलाग केला. त्यांनी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आम्ही खालीच राहत होतो. घरासमोर उघडी गॅलरी होती. तिथं ते उभे राहिले. दलवाईंना एक डोळा मारण्याची फार सवय होती. तिथे ती नडली. नेहमीप्रमाणे त्यांनी डोळा मारला आणि विचारलं, काय आहे? लोकांना वाटलं हा माणूस आपली टिंगल उडवीत आहे. म्हणून ते भडकले. अंगावर धावत आले, शिवीगाळी करू लागले. मी बाहेरच उभी होते. मला कळेना, काय चाललं आहे? हे बिनधास्त उभे, काहीही न बोलता. शेवटी मी त्यांच्या काही मित्रांना बोलावलं. त्या वेळी तिथं भाऊ पाध्ये, शोशन्ना, म्हात्रे, बापट वगैरे राहत होते.

मी भरून पावले आहे : ३९