पान:मी भरून पावले आहे.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण इतरांनी जितकं शिकता येईल तितकं जरूर शिकावं असं त्यांना वाटे. इथपर्यंत की दलवाईं मलासुद्धा कॉलेजला जा, बी.ए. हो. म्हणून सांगत होते. हुसेनचं लग्न मधुभाई आणि नलिनीबाई पंडितची मुलगी शमा हिच्याबराबेर दलवाईंच्या मुळेच झालं. त्यांनी गाववाल्यांची हमी घेतली. आणि तिला आमच्या घरी चांगली वागणूक मिळावी याची काळजी घेतली.

 दोघांच्याही नोकऱ्या चालू होत्या. यांना रेल्वेमध्ये स्टोअरमध्ये जागा मिळाली. दोन वर्षे नोकरी केली. त्याच्यानंतर आम्ही कराचीला जायचं ठरवलं. बासष्टमध्ये आम्ही कराचीला गेलो. त्या वेळी दिल्ली, आग्रा असं ट्रेननं गेलो. दोघांनी रजा काढली. आमच्याकडे फार पैसे नव्हते. प्लेनने जायला जमेना म्हणून आम्ही ट्रेनने गेलो. दिल्ली बघितली, आग्रा बघितला. दोघं आणि मुलगी. मुलगी होती, ती लहान होती, दोन-एक वर्षाची होती. तिला कडेवर घेऊन गेलो. लाहोरला पोचलो तर तिथे चेकनाका लाहोरचा. बायकांचा वेगळा चेकनाका आणि पुरुषांचा वेगळा. त्या वेळी त्या चेकनाक्यावर मी गेले तेव्हा माझ्या हातात दोन बांगड्या सोन्याच्या होत्या. गळ्यातला जो हार होता तो खोटा होता. कानातली फुलं खरी होती. असा थोडासा दागदागिना होता अंगावर. आईच्याच घरातला तो. तिथे गेलो तर ती बाई जी होती ना तिला बघूनच मला कापरं भरलं. ती भयानक होती दिसायला. आणि तिने मला दम देऊन विचारलं, तुझ्या अंगावरचे दागिने खरे आहेत का? मी हो म्हणाले, म्हणजे मला कळेचना का विचारलं ते. हो म्हणाले मी. मग ती म्हणाली, किती तोळ्याचे आहेत? मी म्हणाले, मला काय माहिती तोळा म्हणजे काय? मी कशाला सोनाराकडे जातीये आणि विचारतेय आठ आहे का दहा? दहा ठोकून दिलं. ती म्हणाली, काढ सगळे दागिने. आणि सगळे दागिने काढून त्यांनी वजन केल्यानंतर दहा तोळे भरले नाहीत. तेव्हा ती म्हणाली, तू शिकलेली मुलगी, ऑफिसमध्ये जाणारी, नोकरी करणारी. तुझ्या अंगावरचे दागिने किती तोळ्याचे तुला माहिती नाही? मी म्हटलं, "बाई, तू कशाला विचारतेस, मला क्षमा कर, कशाला विचारतेस? मला माहिती नाही, मी घाबरून बोलले. मी कशाला सोनाराकडे जायला बसले? सोनं तोळाभर आहे का दोन तोळे ? आणि हे दागिने विकायला किंवा बिझनेस करायला घेऊन जावेत असा माझा हेतू नाही. तुला तसं वाटत असेल तर तू हे सगळं ठेवून घे. मी तशीच जाईन. परत येताना तू माझे मला दे." असं बोलल्यानंतर तिला ते खरं वाटलं आणि ती म्हणाली, “काय आहे, हे सगळं बघायचं आमचं काम आहे म्हणून मी तुला बोलले. सॉरी." मी भ्यायले आणि बाहेर निघाले तेव्हा माझा चेहरा पडलेला.

मी भरून पावले आहे : ४१