पान:मी भरून पावले आहे.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आजपर्यंत सुद्धा मी गेले तर मला तोच मान आहे. आजपर्यंत मी एक ग्लास पाणी हातानं घेतलेलं नाही. बाबा म्हणायचे आमचा हमीदखान काय, मेहरू चांगली आहे म्हणून हमीदखान चांगलाय, बायको चांगली असेल तर नवराही चांगला . असतो. बायकोच्या हातात असतं तिने नवऱ्याला कसं ठेवायचं ते. त्यामुळे आमची मेहरूच जास्त चांगली आहे. आमचा हमीदखानही चांगलाच आहे. त्यांनी मला सून म्हणून वागवलं नाही. ते दिवसभर मला घेऊन बसायचे ओट्यावर. आपल्या जुन्या जुन्या काळाच्या गोष्टी सांगायचे. वहीखाता उघडलेला असायचा. त्याच्यात ते लिहीत असायचे. मला एकदा विचारलं, "तुझा जन्म किती साली झाला?" मी सांगितलं की माझा जन्म १९३० चा आहे. मी मे महिन्याची आहे. ते बघितलं आणि ते म्हणायला लागले, मग तू आमच्या हमीदखानपेक्षा मोठी. नंतर मी यांना सांगितलं की बाबांनी असं म्हटलं. तर हे म्हणाले तू बसते कशाला दिवसभर त्यांच्याकडे? आणि सगळं बोलतेस? त्याच्यावर मी म्हणाले, म्हातारा माणूस आहे. गोड आहे. मला त्यांच्याशी खोटं बोलायला जमत नाही. आणि मी मोठी असले तरी तुम्हांला पटलं ना. तुम्हांला नाही ना गैर वाटलं? त्या माणसाची फसवणूक मी का करू? मी मोठी आहे तर मोठी आहे. मला त्याच्यामध्ये कमीपणा वाटण्याचा भाग नाहीए पण त्यांनाही हे माहिती होतं की मी खोटं बोलत नाही, त्याची पण तारीफ ते खूप करत असत. कोणीही आलं की मला बाहेर आणायचे, गाठ घालून द्यायचे. माझी ही सून आहे म्हणून भेट करून द्यायचे. त्यांच्या घरातील माणसं सगळी पुढं नाही यायची, पण मी मात्र पुढे असायची. सगळ्यांच्या पुढे इतकंच नव्हे तर मुल्लाजींच्या पुढे सुद्धा मी जात असे. आमचे मुल्लाजी सगळ्यांना नमाज-बिमाज पढायला मसजिदीमध्ये असायचे आणि कोणी आजारी पडले तर ते पुड्या द्यायचे. कसल्या तरी पुड्या मला पण आणून द्यायचे. एक-दोनदा काय तरी झालं म्हणून पुड्या दिल्या. तो मनुष्य पण इतका चांगला होता. तो पण गावभर सांगत होता की, हमीदखानच्या बायकोसारखी या गावात बाई नाही. हमीदखानने खरोखरच चांगली बायको केली, ती वागते किती चांगलं, ती बोलते किती चांगलं. किती तिचं सगळं 'परफेक्ट' आहे. मला तिथं गेल्यानंतर असं वाटलं की खरोखरच आपण कोणी आहोत. आणि या लोकांमध्येच आपल्याला राहायचंय. मग पुढे त्यांची जबाबदारी घ्यायला फारसं जड गेलं नाही. पैसे आपल्याकडे नाहीत. बाकीचं सगळं सुख तर आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना सुख आहे का? अशा रीतीने विचार केला मी. दोन महिन्यांनंतर मला असं वाटलं की मी नाही चुकले.

मी भरून पावले आहे : ३७