Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि त्यांनी गावभर लोकांना सांगितलं, मेहरूने आज मला असं असं खायला दिलं. याच्यावर मी स्वैंपाक करते हे गावभर झालं. सगळं गाव बघायला आलं. मी चपात्या कशा करते. आमच्याच सारखी करते चपाती, आमच्याचसारखं तिचं वळण आहे. आमच्यासारखं अमूक आहे. आणि परत गाववाले सगळे पुरुष येऊन भेटायचे आणि सगळ्यांच्या समोर मला उभं राहू द्यायचं तर बाबा म्हणायचे की बघ शिकलेली आहे, सवरलेली आहे, पदर कसा ठेवते, कसं लोकांशी बोलते, हे घेण्यासारखं आहे. त्यांच्याकडे दुसरी पद्धत कशी, एका ताटामधे खायचं. कालवणाचं एक ताट पुढे ठेवायचे, सगळ्यांनी हातात भाकरी घ्यायची आणि असं नुसतं बुडवायचं आणि खायचं. तर पहिले दोन दिवस मला ह्यांची मोठी भावजय होती त्यांच्याबरोबर बसवलं. मला काही जेवण गेलं नाही. मला वेगळं खायची सवय. आमच्या घरात एका ताटामध्ये दोन माणसं नाही जेवायची. बोललं पण असं जायचं सगळीकडे की मुसलमानांनी एकाच ताटामध्ये खावं. मुसलमानांना चार-चार ताटं नकोत. वेगळं खायचं नाही. एकाच ताटामध्ये खातो म्हणजे आपण एकत्र राहातो अशी आमच्याकडे म्हण होती. तरी आमच्या घरामध्ये, आत्याच्या घरामध्ये कधीही आम्हांला एका ताटामध्ये बसवलं नाही. आम्हांला सवय तीच पडली. मग यांनी बाबांना सांगितलं, आईला सांगितलं का तिला कुणाच्या ताटात बसवू नको. ती लाजणारी नाही. तू तिला वेगळं दे. तिला असं आवडणार नाही. तिचा जेवणाचा टाईम अमुक आहे. तिला हे हे आवडतं, असं सगळं सांगितलं. ते मला म्हणायचे तू त्यांच्यासारखी होऊ नको. तुझ्यासारखं त्यांना करून दाखव. त्यांच्यात आणि तुझ्यात फरक आहे की नाही? त्यामुळे वेगळ्या ताटात खायचं. तिथे टी.बी.चे पेशंट बरेच. त्या काळामध्ये त्या गावामध्ये यांचे चार मामा होते. चौघांना टी.बी. होता. सीव्हियर टी.बी. होता. म्हणून मी त्यांना सांगत असे की एका ताटात जेवायचं नाही, एका भांड्यातनं पाणी प्यायचं नाही. हे सगळं वेगळं करायचं. बाबा पण म्हणायचे की ती जे सांगते ना, ते आपल्याला करायला पाहिजे. काही हरकत नाही. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही असं नाही करायचं. ती शिकलेली मुलगी आहे. तुम्ही अडाणी आहात. बाबासुद्धा असं म्हणायचे, त्यामुळे मी जे बोलते ते घरात सगळ्यांनी उचलून धरलं आणि सगळ्या गावभर झालं. ती मेहरुन्निसा आली ना, ती म्हणते असं. त्या काळामध्ये माझा जो फोटो बाबांना पाठवला होता तो ओट्यावर बाबांच्या फोटोबरोबर लावलेला होता आणि येईल त्याला सांगायचे की, ही माझी सून म्हणून. म्हणजे इतका त्यांना अभिमान वाटायचा.

३६ : मी भरून पावले आहे