Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि तिथून आल्यानंतर मी सुखानं सांगत होते की, माझं सासर खूप चांगलं आहे म्हणून.

 पण आल्यानंतर आम्हांला घर कुठे होतं राहायला? घरच नव्हतं. दोघांना नोकऱ्या मिळाल्या पण राहायला घर नाही. महंमददांकडे दोन महिने राहिलो, काय करायचं? मग दुसरे एक दलवाई होते – हुसेन दलवाई. आमदार होते ते काँग्रेसचे, तर त्यांच्या ओळखीने पत्र घेऊन वडाळ्याच्या सॅनिटोरियममध्ये चार महिने काढले, तिथे टी.बी.च्या पेशंटला जागा मिळते. त्यांना खोटं सांगितलं की यांना टी.बी. झालेला आहे आणि तिथं आम्ही राह्यलो चार महिने. मी गावाहून आले तेव्हा बाबांनी सांगितलं, सासूने सांगितलं की तुझं घर नाहीए पण तुझं घर होणारे. तुला काय पाहिजे ते घे आणि मला जे जे पाहिजे होतं त्या घरातलं, ते सगळं मला दिलं. मला काय, भांडीकुंडीच पाहिजे होती, काहीच नव्हतं आमच्याकडे. थोडी भांडीकुंडी, एक गादी घेतली. चार महिने वडाळ्याला राहिलो. तेव्हा माहीमला एक बिल्डिंग नवीन झाली होती. आणि खालीच तिचा मालक रहायचा. तो कोकणीच होता, यांना ओळखणारा होता. मुस्लिम होता. तर वरच्या फ्लोअरवर एक रूम खाली होती. त्यांनी सांगितलं की दीड हजार रुपये डिपॉझिट आणि पंचेचाळीस रुपये भाडं. त्या वेळी ते सुद्धा जास्त होतं. पैसे कुठून आणायचे? त्यांच्या चुलतभावाकडे मी मागायला गेले की, एक हजार रुपये द्या, पगारातनं पैसे फेडीन म्हणून. त्यांनी सगळं गोलमाल बोलून पैसे मात्र दिले नाहीत. नाहीही म्हणाले नाहीत आणि होयही म्हणाले नाहीत. त्याच्यानंतर काय झालं, मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा माझ्या आईकडे पन्नास रुपये चिटफंडाचे म्हणून टाकत होते. त्याचे दीड हजार रुपये जमले होते. पण तिच्याकडे जायचं कसं? प्रश्न पडला. तर हे म्हणाले जाऊ या, म्हणून हे मला घेऊन गेले. हे खाली उभे राहिले आणि मी वर चढले आणि आईला सांगितलं की असं असं आहे आणि पैसे तू मला दे. तर तिने ते पैसे दिले नाहीतच. मला ती म्हणाली, आत्ता लगेच कशाला? काय करायचंय? सध्या तुम्ही काही तरी करा, बघा, मग मी देईन नंतर. असं करून तिने ते द्यायचे नाकारले. इतक्यात काय झालं, माझा जो धाकटा भाऊ होता त्याच्या लक्षात आलं की मी एकटी आले नसेन. नाक्यावर हे उभे असतील. असं समजून तो खाली उतरला. त्यानं ह्यांना बघितलं आणि तिथं खूप बाचाबाची झाली. खूप जोराची. पब्लिक जमा झाली खूप. आणि जेव्हा लोकांना कळलं की हे हमीद दलवाई आहेत तेव्हा सगळ्यांनी त्यांचीच बाजू घेतली आणि भावाची बाजू लंगडी पडली. मग हे चिडले. तडतड करून वर आले.

३८ : मी भरून पावले आहे