पान:मी भरून पावले आहे.pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतकी माणसं आल्यानंतर कोणी एखादं कवठ म्हणजे अंडं आणून दिलं. हे तुमच्या सुनेला खायला घाला म्हणून. द्यायला काही नसायचं ना. गरिबी भयंकर पण प्रेम खूप. दोन पापड आणले, हे तळून द्या. त्यांना भाजून द्या. अशा रीतीने एवढे तांदूळ आणले. एवढी तुरी आणली, हे आमच्याकडून घ्या. तुमच्या सुनेला द्या, असं म्हणायचे. अशी लोकं यायची, बघायची. ती बसलेली कशी आहे? उठते कशी? दिसते कशी? हिचे केस कसे? हिचं नाक कसं? हिचं तोंड कसं? एवढं खोलात जाऊन ती लोकं बघायची आणि म्हणायची, "हमीदखानची बायको खूप चांगली आहे." त्या वेळी तरुण होते मी आणि पदर-बिदर घेण्याची पद्धत-बिद्धत त्यांच्यापेक्षाही चांगली होती माझी. त्यामुळे सगळ्यांना चांगलं वाटलं. पहिल्यांदा त्यांना वाटलं होतं की शहरातनं आलेली बाई कशी तरी फॅशनेबल असेल. माझा पदर डोक्यावरून घेतलेला असायचा. बाबा तर सगळ्या गावभर सांगत, "चांगल्या घराण्यातली आहे. शिकलेली आहे, नोकरी करणारी आहे. खान घराण्यातली आहे. आणि एवढ्या मोठ्या घराण्यातली आमच्या हमीदखानच्या मागे कशाला बरं आली? मुलगीच चांगली आहे. आणि आमच्या घरातसुद्धा चांगलंच घडेल आता." आणि मी गेले तर माझ्या दोन नणंदांचं लग्न जमलं. तिथलीच मुलं. आणि दलवाईंना लगेच रेल्वेमधला कॉल पण आला. म्हणजे आम्ही दोन महिन्यांची सुट्टी संपवून घरी आलो मुंबईला आणि त्यांना नोकरी लागली. म्हणजे एक महिना सुद्धा त्यांनी बसून माझ्या पगारावर खाल्लेलं मला आठवत नाही.

 दोन महिने मी राहिल्यावर तिथलं वातावरण पाहून शॉक बसलेला. त्यांच्यात ती पद्धत. प्रत्येकाच्या घरी जेवायला बोलवायचं. एक रात्र ठेवायचं आणि आपले नवीन कपडे घालून द्यायचे. मग ते कपडे आपण परत करायचे त्यांना. तर बाबांनी गेल्याबरोबर सांगितलं, वजन करा हिचं. ही परत जाईल तेव्हा दहा पौंड वजन वाढलं पाहिजे हिचं. तसंच झालं होतं. लोकं म्हणाली. 'काय बाई लग्न मानवलय तुला. कसलं काय खाल्लं तू तिकडे?' रोजचं जेवण इतकं फर्स्ट क्लास. तिथं ना जेवण इतकं चांगलं करायचे आणि तिथं एक बघितलं मी की बायका साडी नेसायच्या पण पदर घेण्याची पद्धत वेगळी होती. उजव्या बाजूला घ्यायचा आणि खोचायचा कमरेला तो पदर. आमच्याकडे तसं नव्हतं. त्यांची भाषा कोकणी म्हणजे मराठीला रुळलेली. आमच्याकडे उर्दू बोलायचे. ते मुसलमान, आम्ही पण मुसलमान पण त्यांची नमाजाची पद्धत वेगळी. आमची वेगळी. आणि ह्या सगळ्यामुळे कोकणी आणि दख्खनी मुसलमान यांच्यात बेटी व्यवहार होत नसे.

३४ : मी भरून पावले आहे