दोघांमध्ये सगळ्याच दृष्टींनी फरक पडला ना. बरं, ते मासे जास्त खाणारे. ते डोक्याने हुशार. घारे डोळे सगळ्यांचे पण अंगाने किरकोळ आणि आम्ही घाटावरचे. आम्ही मटण खाणारे. त्यामुळे आम्ही धडधाकट असे टणक. पण आम्हांला डोकं कमी. म्हणजे मी जे तर्क काढले त्या हिशोबाने असं. हे घारे डोळे बघून माझी आत्या म्हणाली होती, घारे डोळेवाले फार लबाड असतात हं. माझी काकी म्हणाली, तू लग्न करायला निघालीस, लग्न करायला हरकत नाही पण गावाला जाऊन बघ, त्याची दुसरी बायको नाही ना. ही खात्री केल्याशिवाय तू लग्न करू नको. आणि त्याच्यावरसुद्धा तुला ती बायको चालत असेल तर तुझा तू विचार कर! यांना मी विचारल्यावर हसले होते. म्हणाले होते, चल मी तुला दाखवतो गावात माझ्या किती बायका आहेत ते. आणि गावामधे खूप मजा आली. म्हणजे आम्ही शेतात जात असू, पाण्यात जात असू. हे आमचं शेत, ही आमची बाग. घर वाईट असलं तरी जेवण फर्स्ट क्लास मिळायचं. बाबांनी त्या वेळी खूप केलं. म्हणजे कोंबडी काय कापली. हिच्याकडे जेवण, तिच्याकडे जेवण आणि एवढा मान. माझे केस मोठे होते, एवढं कौतुक व्हायचं त्याचं. सासूबाई केसाला तेल लावायच्या. तिथं नारळ खूप. कधी नारळ खराब झालेला वाटायच्या. ते लावायच्या, रगडायच्या, सासूबाई माझी पाठ रगडून घासून आंघोळ घालायच्या. दोन महिने त्या मला आंघोळ घालीत होत्या. गरम पाणी वापरून. मी दोन महिन्यामधे एक ग्लास पाणी घेतलं नाही हाताने. बसून नुसतं. खाटेवर बसून खायचं. त्यांच्या घरामधे गहू येत नव्हता. त्या वेळी गहू माहिती नाही. का तर, पैसाच नसायचा एवढा. गहू कुठून आणणार? तांदुळाचंच सगळं. आणि आमच्या घरात तर सकाळी गव्हाच्या पिठाचे परोठे-बिरोठे असायचे. बाबांच्या तोंडात दात नव्हते तर सासू काय करायची; तांदुळाचीच भाकरी करायची आणि काय तरी कालवणाला. ते कालवणाला निसदा म्हणायचे. पाव तुकडा खायला म्हाताऱ्याला दोन तास लागायचे. रोज बघितलं. मग मी एक दिवस आमच्या सासूबाईंना सांगितलं की आपण गहू आणू. तर काय करायचं? हे आणि मी जाऊन गहू आणायचे. थोडेसे गहू आणले, दळून आणले. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की मी स्वैपाक करणार आणि मी चपात्या केल्या. दोन चपात्या केल्या. अशा चुरल्या. साखर-दूध घातलं. आणि त्यांच्यासमोर नेऊन ठेवलं. आणि सांगितलं बाबा, तुम्ही आज हे खाऊन बघा. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते खाल्लं पाच मिनिटांत.
मी भरून पावले आहे : ३५